शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2017 (10:48 IST)

मुक्तच्या विविध पुरस्कारांची घोषणा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा कुलगुरु प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी  नाशिक येथे केली. त्यात अत्यंत मानाचा समजला जाणारा २०१७ चा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, कवी, नाटककार, समीक्षक, प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांना तर बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कारासाठी लातूरच्या सौ. मेनका धुमाळे यांना जाहिर करण्यात आला आहे. गुरुवार (दि.१५) जून रोजी विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात सकाळी ११ वाजता हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन मुक्त विद्यापीठातर्फे गौरविण्यात येते. डॉ. शिवप्रकाश यांचे इंग्रजी आणि कन्नड भाषेतील साहित्यात मोठे योगदान आहे. त्यांनी ९ काव्यसंग्रह संपादित केली असून १५ नाटकांचे लेखन केलेले आहे. याशिवाय त्यांच्या अनेक कवितांचे भारतीय आणि युरोपीय भाषांत अनुवाद, अनेक देशी-विदेशी नामवंत नियतकालिकांतून साहित्य प्रकाशित झालेले आहे. वाड्मयीन व नाट्यविषयक चर्चासत्रांचे देशभर आयोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. साहित्य अकादमीच्या‘इंडियन लिटरेचर’ या नियतकालिकाचे अनेक वर्ष संपादनही केले. याबरोबरच तीन वर्ष बर्लिनला टागोर केंद्रात (भारतीय दुतावास) निर्देशक, कवितेसाठी आयोवा विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कविता प्रकल्पात सहा महिने काम, विविध चर्चासत्रासाठी इंग्लंड, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रीया, पोलंड, तुर्की, बांगलादेश, चीन, थायलंड, जपान, दक्षिण अमेरिका आदी देशांत जाऊन इंग्रजी आणि कन्नड साहित्याचे आदानप्रदान करण्यातसुद्धा डॉ. शिवप्रकाश यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांना आजवर २० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. हा सातवा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार असून यापूर्वी हिंदी साहित्यिक डॉ. विष्णू खरे, नागालँडच्या ज्येष्ठ साहित्यिक तेमसुला आओ, पंजाबी साहित्यिक डॉ. सुरजित पातर, गुजराथी सीतांशू यशश्चंद्र, कन्नड भाषेतील कवी जयंत कैकीनी, हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत देवताले आणि मल्याळी साहित्यिक डॉ. के सच्चिदानंदन या साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले आहे.

याबरोबरच विद्यापीठातर्फे दिला जाणारा सन २०१६ चा बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार लातूर येथील नवोदित कथा लेखक सौ. मेनका बाबुराव धुमाळे यांना त्यांच्या ‘कोरडा पाऊस’ या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. सौ. धुमाळे ह्या जिजामाता कन्या प्रशाला, लातूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांना आजवर अंकुर साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कारचला कवितेच्या बनात उदगीर अंतर्गत दिला जाणारासाहित्य साधना पुरस्कारसाहित्यज्योती कथा पुरस्कार, नॅशनल बुक ट्रस्ट व राजन गवस संपादित ‘नवकथा लेखनमाला’ या कथासंग्रहात कथेचा समावेश असून विविध दिवाळी अंकातून कथालेखन केले आहे. 

गुरुवार दि. १५ जून २०१७ रोजी मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीत सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरणाचा सोहळा होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन असतील. या कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.