गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (16:57 IST)

नांदगाव जमिन घोटाळा : ११ महसुली अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

कुठल्याही प्रकारचे अधिकार नसतांना जमिनीची खरेदी-विक्री करुन सरकारकची तब्बल पावणेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येवल्याच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी, तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन व इतर नऊ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांखेरीज १२ खासगी व्यक्तींविरुध्द नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नांदगाव तालुक्यातील कासारी गावच्या शिवारातील जमिनीची खरेदी-विक्री करताना हा घोटाळा झाला आहे. येथील शासनाच्या मालकीच्या नवीन अविभाज्य शर्तीच्या भोगवटादार वर्ग-२ जमिनीच्या हस्तांतरणासाठी विहीत पद्धतीला फाटा देत प्रांताधिकार्‍यांसह संशयितांनी शासनाची फसवणूक केल्याचे याबाबतच्या फिर्यादीत म्हटले आहे.
 
सरकारच्या निर्णयानुसार तहसीलदार या पदास या जमिनीच्या खरेदी- विक्रीसंबंधी कोणतेही अधिकार प्राप्त नाही, तसेच महसूल कायद्यात तहसीलदारास शासकीय जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी किंवा नोंदी मंजुरीसाठी कोणतेही अधिकार नाहीत. मात्र, लोकसेवक तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी शासनास मिळणारा नजराणा महसूल वसूल न करता बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री व्यवहार नोंदविण्याचे आदेश दिल्याचे निष्पन्न झाले आहेत. या प्रकरणात तलाठी व्ही. पी. सोनवणे, व्ही. बी. बोडके, जयेश एम. मलदुडे, व्ही. पी. गायकवाड यांनी शासनाच्या मालकीच्या अविभाज्य शर्तीच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या फेरफार नोंदी केल्या आहेत. महसूल कायद्यातील तरतुदीप्रमाणे फेरफार नोंद करण्यापूर्वी जमीन कोणत्या प्रकारची आहे, याची पडताळणी करण्याची जबाबदारी तलाठय़ांची आहे. मात्र, संबंधित तलाठय़ांनी पडताळणी न करता नियमबाह्य फेरफार नोंदी करून खरेदीदाराशी संगनमत करत खरेदी-विक्री व्यवहाराच्या हस्तांतरणात सामील होऊन शासनाचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंडल अधिकारी एस. के. आहेर, डी. ए. कस्तुरे, अशोक ए. शिलावट यांनी नोंदी मंजूर करताना या प्रकरणात पदाचा गैरवापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन प्रांताधिकारी वासंती माळी यांनी टाळाटाळ केली, तसेच कारवाई केली नाही, असेही याबाबतच्या फिर्यादीत म्हटले आहे.
 
गुन्हात दाखल झालेली नावे 
येवला उपविभागीय अधिकारी वासंती माळी, तत्कालीन निलंबित तहसीलदार सुदाम महाजन, तत्कालीन प्रभारी तहसीलदार पूनम दंडिले, तत्कालीन सहायक दुय्यम निबंधक डी. डी. पंडित, मंडल अधिकारी एस. के. आहेर, डी. ए. कस्तुरे, अशोक ए. शिलावट, तलाठी व्ही. पी. सोनवणे, व्ही. बी. बोडके, जयेश एम. मलदुडे, व्ही. पी. गायकवाड, खासगी व्यक्ती जयंतीभाई कानजीभाई पटेल (नाशिक), शिवाजी तात्याबा सानप (कासारी), भावीन जयंतीबाई पटेल (नाशिक), प्रवीणभाई कानजीभाई पटेल (नाशिक), प्रशांत शिवाजी सानप (कासारी), अर्जुन रामजी माकाणी (नाशिक), शिवलाल अर्जुन माकाणी (नाशिक), रंजन शिवलाल माकाणी (नाशिक), विनोद शिवलाल माकाणी (नाशिक), भारती महेश शहा (नाशिक), पोपट लल्लूभाई पटेल (नाशिक). या जमीन घोटाळ्यात एकाच वेळी एकाच प्रकरणात ११ महसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होण्याची ही बहुदा पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.