1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (09:34 IST)

नवनीत राणा यांचा CM ठाकरे यांना टोला, म्हणाल्या ‘आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाही’

Navneet Rana
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारे त्यांनी लोकांना आपली काळजी स्वत:च घेण्याचे अन् कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले. मात्र या मोहिमेवरुन आता खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आधी माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि आता फक्त माझी जबाबदारी म्हणून सरकारला हात वर करता येणार नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला आहे.
 
वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्ट्न्सिंग, सॅनिटायझरचा वापर आदी आवश्यक आहे. मात्र नागरीक या नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन अपेक्षितच आहे. मात्र, लॉकडाऊन जाहीर करताना सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी देणे सरकारचे कर्तव्य आहे. तसेच आम्ही शिवजयंती साजरी केली तर आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. मात्र, महाविकास आघाडीमधील नेत्यांचे जाहीर कार्यक्रम सुरु आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन 1 मार्चपासून होणार आहे. असे असताना राष्ट्रवादीचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत, यातून वेगळा संदेश जाऊ शकतो, असेही राणा यांनी म्हटले आहे. दरम्यान शहरात शिवजयंती कार्यक्रमात विनामास्क उपस्थित राहणे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा व कोरोनाचे नियम पायदळी तूडवल्या प्रकरणी खासदार नवनीत राणा, आमदार रवी यांच्यासह 15 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.