शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (09:07 IST)

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष: सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या वारसदार होतील का?

supriya sule
मयुरेश कोण्णूर
 शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून पडला होता. जेव्हा अजित पवार अगोदर राजकारणात आले तेव्हा त्यांच्याकडे हा वारसदार म्हणून पाहिलं जाऊ लागलं. पण 2006 मध्ये जेव्हा सुप्रिया सुळे राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या तेव्हा या वारसदारीवर त्यांचाही हक्क आला.
 
2019 मध्ये निवडणुकीदरम्यान सुप्रिया सुळेंनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की 'शरद पवारांचा वारसदार कोण हे काळ ठरवेल'.
 
हा प्रश्न शरद पवारांनाही सतत विचारला गेला आहे. पण तेही कायम सुप्रिया सुळेंना दिल्लीच्या राजकारणात आणि अजित पवारांना राज्यात रस आहे असं उत्तर कायम देत आले आहेत. अजित पवारांनीही कधी नेमकं उत्तर दिलं नाही. परिणामी इतके वर्षं प्रश्नचिन्ह कायम राहिलं.
 
हाच प्रश्न ठाकरे घराण्यातही होता. पण बाळासाहेबांच्या हयातीतच राज ठाकरेंचं बंड झालं, ते बाहेर पडले आणि शिवसेनेची सूत्रं उद्धव ठाकरेंकडे आली. पण शरद पवारांनी तो प्रश्न त्यांच्या हयातीत पक्ष आणि कुटुंबात दरी न पडता मिटवायचा ठरवलेलं दिसतं आहे.
 
असं नाही की या पूर्वी पक्ष अथवा कुटुंबात यावरुन तणाव निर्माण झाला नाही. जेव्हा 23 नोव्हेंबर 2019ला अजित पवारांनी बंड करुन देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं त्या दिवशी सुप्रिया सुळेंनी उद्वेगानं ठेवलेलं 'Party and Family Split' हे Whatsapp स्टेटस या संघर्षाची साक्ष होता.
 
पण हा संघर्ष अद्याप कधीही हाताबाहेर अथवा ठाकरेंच्या शिवसेनेत जे झालं त्या मार्गानं गेला नाही. त्यामुळेच जेव्हा चार दिवसांनी अजित पवार 'स्वगृही' परतले तेव्हा बहुमत चाचणीवेळेस विधिमंडळाच्या दारात सुप्रिया सुळे हसतमुखानं स्वागताला उभ्या होत्या आणि अलिंगन देऊन अजित पवारांचं स्वागत त्यांनी केलं.
 
'ताई' आणि 'दादां' मधलं प्रेम आणि सोबतच द्वंद्व हे राष्ट्रवादीला आणि या पक्षाचं राजकारण पाहणाऱ्याला नवीन नाही. त्यामुळेच आता स्वत: शरद पवारांनीच राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यावर ती जबाबदारी सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांच्यापैकी एकाकडे घरातच जाईल असाच कयास लावला जातो आहे.
supriya sule
अजित पवारांची आक्रमक राजकारणाची प्रवृत्ती पाहता सुप्रिया सुळे त्यांचा प्रभाव कसा प्रस्थापित करतील हा प्रश्न पहिल्यापासूनच विचारला गेला आहे.
 
पवारांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केल्यावर जो अभूतपूर्व गोंधळ तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये उडाला, तेव्हा त्यांना सांभाळण्याचं काम हे भाऊ-बहिणच करत होते. पण तेव्हाही अजित पवारांनी एका प्रकारे दरडावून 'सुप्रिया, मी सांगतो आहे, तू बोलू नकोस' असं सगळ्यांसमोर सांगितलं.
 
पण तरीही या आक्रमक प्रभावामध्येही गेल्या 17 वर्षांच्या राजकारणात सुप्रिया सुळेंनी पक्षामध्ये, राज्याच्या राजकारणात आणि मुख्य म्हणजे दिल्लीच्या राजकारणात स्वत:ची एक जागा निर्माण केली आहे. त्यामुळे आज जेव्हा पवारांच्या अधिकृत उत्तराधिकारी त्या होऊ शकतात अशी गंभीर चर्चा सुरु आहे, तेव्हा सुप्रिया यांच्या या प्रवासावर नजर फिरवणं आवश्यक ठरतं.
 
'वडिलांचा अंदाज मुलगी चुकीचा ठरवते, त्याचं सुप्रिया हे उदाहरण'
सुप्रिया सुळेंचा राजकारणात प्रवेश खूप उशिरा झाला. तोपर्यंत 'राष्ट्रवादी'ची स्थापना होऊन अर्ध दशक उलटलं होतं. ज्यांच्याकडे शरद पवारांचा उत्तराधिकारी आणि पवारांच्या पुढच्या पिढीतला राजकीय प्रतिनिधी म्हणून तोवर पाहिलं गेलं होतं त्या अजित पवारांकडे संघटनेचा आणि मंत्रिपदाचा बराच अनुभव जमा झाला होता. सुप्रियाही कौटुंबिक जबाबदारी पाहात होत्या.
 
शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीमुळे त्या बहुतांशी मुंबईत वाढल्या होत्या. इथंच त्यांचं शिक्षण झालं आणि परदेशातही झालं. पण शरद पवारांचा दिल्लीच्या राजकारणात जम बसलेला असतांना सुप्रिया सुळेंचा राजकीय प्रवेश दिल्लीपासूनच करायचा असं ठरलं. पवारांनीही अनेकदा बोलून दाखवलं आहे की त्यांना कधी सुप्रिया या राजकारणात येतील असं वाटलं नव्हतं.
 
17 सप्टेंबर 2022 च्या एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते, "सुप्रिया कधी राजकारणात येईल असं मला वाटलं नाही ही गोष्ट खरी आहे. पण एकच मुलगी असेल तर बापाला बऱ्याचशा गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यातलीच ही गोष्ट. मला वाटलं की ती राजकारणात येणार नाही, पण वडिलांचा अंदाज चुकीचा कसा आहे, हे मुलगी ठरवू शकते, त्याचं हे उदाहरण."
 
सुप्रिया सुळे 2006 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेत खासदार म्हणून पोहोचल्या. अजित पवारांचा राजकारणप्रवेश लोकसभेतून झाला होता, तर सुप्रियांचा राज्यसभेतून. तेव्हा महाराष्ट्रातून एकच जागा शिल्लक होती. कॉंग्रेससोबतच्या आघाडीत ती जागा 'राष्ट्रवादी'कडे आली.
supriya sule
पण पलीकेडे शिवसेना-भाजपची युती होती. पण शरद पवारांशी असलेल्या मैत्री आणि कौटुंबिक नात्यामुळे आणि त्यांच्या मुलीची पहिली निवडणूक असल्यानं बाळासाहेब ठाकरेंनी ती निवडणूक बिनविरोध करायचं ठरवलं. युतीनं सुप्रियांविरोधात उमेदवार दिला नाही आणि त्या पहिल्यांदा बिनविरोध खासदार झाल्या.
 
सुप्रिया त्यानंतर राजकारणात स्थिर होत गेल्या आणि पक्षांतर्गतही त्यांच्याकडे जबाबदाऱ्या येऊ लागल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली 2012 मध्ये 'राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस'ची स्थापना झाली. उद्देश होता की अधिकाधिक महिलांना राजकारण आणि समाजकारणात आणणं.
 
शरद पवार एकीकडे अजित पवार, जयंत पाटील, आर आर पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील अशी महाराष्ट्राच्या राजकारणातली नवी पिढी त्यांच्या पक्षामधून तयार करत असतांना तरुण आणि महिलांचा चेहरा म्हणून सुप्रिया सुळेंना पुढे केलं जाऊ लागलं.
 
बारामतीच्या खासदार
यानंतर सुप्रियांच्या राजकीय आयुष्यात मोठा टप्पा आला तो म्हणजे जो मतदारसंघ शरद पवारांसाठी देशभर ओळखला जातो, तो बारामती लोकसभा मतदारसंघ त्यांनी 2009 सालच्या निवडणुकीत आपल्या मुलीसाठी सोडला.
 
पवार कायमस्वरुपी दिल्लीच्या राजकारणात गेले तेव्हा त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघ पुतणे अजित पवारांकडे दिला आणि आता लोकसभा मतदारसंघ मुलीकडे. स्वत: पवार माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.
 
पण जो मतदारसंघ सुप्रिया सुळेंकडे आला होता तो पहिल्यासारखा राहिला नव्हता. त्याच वर्षी 2009 मध्ये देशभरात मतदारसंघ पुनर्रचना झाली होती. पुणे जिल्ह्यात जे दोनच मतदारसंघ होते त्याचे चार झाले होते.
 
नव्या बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि भोर या ग्रामीण भागांसोबत दाट शहरीकरण झालेले खडकवासला आणि हडपसर हे पुणे शहरातले भागही आले होते. त्यामुळे सुप्रिया सुळेंना शहरी आणि ग्रामीण अशी दोन्ही कसरत करावी लागणार होती.
 
शरद पवारांची राजकीय पुण्याई होतीच, पण हा मतदारसंघ बांधत सुप्रिया सुळे 2009 ला तर निवडून आल्याच पण 2014 आणि 2019 मध्ये 'मोदी'लाट असतांनाही त्या सलग तिस-यांदा खासदार झाल्या.
 
त्यांचं इथलं राजकारण जवळून पाहणा-या पुण्याचे पत्रकार अद्वैत मेहता यांच्या मते शरद पवारांच्याच पावलावर पाऊल ठेवत सुप्रिया यांनी या मतदारसंघात इतक्या वर्षात प्रतिस्पर्धी उभाच होऊ दिला नाही.
 
गेल्या 17 वर्षांत सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत बारामती मतदारसंघाची उत्तम बांधणी केली आहे. मतदारसंघातील जनतेशी प्रश्न सोडवण्याच्या निमित्ताने सातत्याने संपर्क असतो. स्वत:च्या कार्यकर्त्यांची फळी उभारून त्यांनी आपली पकड मजबूत ठेवलीय.पवारांची पुण्याई ,सावली असली तरी त्यांनी स्वतःचा ठसा ,स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. इथल्या सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे संबंध आहेत. विरोधक हे केवळ निवडणूक आली की जागे होतात आणि हेच त्यांच्या पथ्यावर पडतं," असं अद्वैत म्हणतात.
 
"सुरुवातीला त्या नवख्या होत्या. पण पवार साहेबांची काम करायची स्टाईल पाहून त्या हळूहळू शिकत गेल्या," पुण्यातले 'राष्ट्रवादी'चे नगरसेवक विशाल तांबे सांगतात. ते सुप्रिया सुळेंच्याच मतदारसंघात असलेल्या भागातून नगरसेवक आहेत. "एखादं काम सांगितलं की त्या समजून घेतील, कसं करायचं विचारतील, अधिकाऱ्यांशी बोलतील. अजित पवारांसारखं आक्रमक नाही, पण पवार साहेबांसारखं शांतपणे त्या करतात," तांबे सांगतात.
 
"त्यांच एक वैशिष्ट्यं म्हणजे त्यांच्याकडे कायम स्वत:ची डायरी असते आणि त्या स्वत: त्यात नोंदी करतात. कोणाला वेळ द्यायचा आहे, कोणाचं काय काम आहे या नोंदी त्या स्वत: करतात. मतदारसंघातलं असो वा बाहेरचं कोणतंही, त्या सगळं नोंदवून घेतील आणि पहिल्यापेक्षा जास्त व्यवस्थित करायचा प्रयत्न करतील," विशाल तांबे सांगतात.
 
दिल्लीतली कामगिरी
जेव्हा सुप्रिया सुळे यांचं नाव शरद पवारांपश्चात 'राष्ट्रवादी' कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण त्यांचा दिल्लीतला वावर आणि अनुभव हा आहे. शरद पवारांनी कायम 'सुप्रिया दिल्लीत आणि अजित महाराष्ट्रात' अशी रचना कायम ठेवण्याच्या प्रयत्न केलेला दिसतो.
 
पवार स्वत: लोकसभेतून बाहेर पडले आणि तिथे सुप्रिया सुळे आल्या. तेव्हापासून सगळ्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर पक्षाची भूमिका सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली आहे.
 
"2006 ला राज्यसभेवर आणि 2009 पासून लोकसभेवर म्हणजे गेल्या जवळपास 17 वर्षांपासून सुप्रिया सुळे दिल्लीचं राजकारण करतायत. शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचा साधा सहवासही अनेकांना झपाटून टाकतो. सुप्रिया तर त्यांच्या कन्या आहेत. साहजिकच त्यांच्या सानिध्यात राहून पवारांचेच काही गुण त्यांनीही आत्मसात केल्याचं दिसतं," 'एबीपी माझा'चे दिल्लीतले प्रतिनिधी प्रशांत कदम सांगतात.
 
"त्यात दिल्लीत सगळ्यात प्रकर्षानं जाणवणारी बाब म्हणजे मराठी वर्तुळाच्या बाहेर पडत सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध. पवारांचे संबंध हे एका पिढीशी होते, तर सुप्रियाताईंनी त्यांची दुसरी पिढी हेरत स्वत:चं एक उत्तम सर्कल उभं केलं आहे. लोकसभेतल्या कामाला इतकं गांभीर्यानं घेणारे खूप मोजके खासदार आहेत त्यापैकी सुप्रिया सुळे एक."
 
"संसदेतल्या चर्चा, प्रश्न विचारणं यात त्यांचा कायम हिरीरीनं सहभाग राहिला आहे. भाषणात टीका करताना, सरकारला त्यांच्या उणिवा दाखवताना संसदीय शैली कुठेही सोडत नाहीत हा त्यांचा विशेष गुण अगदी पवारांकडूनच आलेला दिसतो," प्रशांत पुढे सांगतात.
 
सुप्रिया यांची लोकसभेतली कामगिरी अभ्यासकांच्या नजरेतूनही कौतुकाची राहिली आहे. त्यांची अधिवेशनातली उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांची संख्या, भाग घेतलेल्या चर्चांची संख्या ही कायम इतरांपेक्षा अधिक राहिली आहे. त्यांना त्यासाठी पुरस्कारही मिळाले आहेत.
 
शरद पवारांसोबत त्या दिल्लीतल्या विविध राजकीय बैठकांनाही त्या हजर असतात. त्यामुळे पवारांनंतर राष्ट्रवादीतल्या त्या आणि प्रफुल्ल पटेल हे दोनच नेते आहेत जे दिल्लीच्या राजकारणात एवढे सक्रिय आहेत. त्यामुळे देशभरातल्या पक्षांशी त्यांचे संबंध तयार झाले आहेत.
 
ताई, दादा आणि होऊ शकणाऱ्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
पण असं असलं तरीही अजित पवार की सुप्रिया सुळे या प्रश्नानं दोघांनाही राष्ट्रवादीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भंडावून सोडलं आहे. शरद पवारांचा वारसदार कोण हा प्रश्न मुख्य आहे आणि त्यानंच दोघांच्या राजकारणाला आकारही दिला आहे.
 
सुप्रिया सुळेंनी या वारसदारीबद्द्ल 'इंडिया टुडे'च्या मुलाखतीत एकदा म्हटलं होतं, "मी स्वत:ला माझ्या वडिलांची राजकीय वारसदार म्हणून पाहात नाही. केवळ रक्ताच्या नात्यानं वारसदार तयार होत नसतात. अनेक जण म्हणतात की माझे वडील हे यशवंतराव चव्हाणांचे राजकीय वारसदार आहेत. त्यामुळे पुढे जाऊन समजेल की माझ्या वडिलांचा वारसा खरोखर सांभाळू शकते का."
 
वास्तव पाहिलं तर अजित पवारांना मानणाऱ्या महाराष्ट्रातल्या पक्षसंघटनेतल्या पदाधिकाऱ्यांची, आमदारांची, खासदारांची संख्या अधिक भरेल. पण राजकारणात आल्यापासून शरद पवारांच्या सावलीसारख्या वावरणा-या सुप्रिया सुळेंना मानणाऱ्यांची संख्याही वाढत गेली आहे.
 
शिवाय त्यांनी पक्षांतर्गत जे अनेक उपक्रम राबवले, योजना सुरू केल्या, सामाजिक कामं सुरू केली, शैक्षणिक संस्था सुरु केल्या त्यातूनही त्यांचं स्वत:चा समर्थक वर्ग तयार झाला आहे.
 
"केवळ बारामती ,पुणे किंवा दिल्लीच नाही तर संपुर्ण राज्यात सुप्रिया यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. पवारांची वारसदार किंवा उत्तराधिकारी अमुक अमुक हे नरेटिव्ह किंवा परसेप्शन माध्यमात तयार असलं तरी ग्राउंड रिऍलिटीशी मॅच झालं तरच ते अस्तिवात येऊ शकतं," अद्वैत मेहता सांगतात.
 
पण अजित पवारांशी त्यांचं असलेलं नातं हा कायमच एक चर्चेचा विषय राहिला आहे. पक्षांतर्गत सूत्रांकडून कायम त्यातली स्पर्धात्मकता समजत असते, पण बऱ्याच प्रसंगात दोघे बहिण भाऊ म्हणून एकत्र उभे आहेत असंही दिसलं आहे. बऱ्याचदा अजित पवारांची बाजू सुप्रिया यांनी माध्यमांमध्ये लावून धरली आहे.
 
"अजित पवारांशी नातं रक्ताचं आहे,भावनिक आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा लपवलेली नाही आणि ते उत्तम CM होऊ शकतात हे सुप्रिया यांनीही बोलून दाखवलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी 2019 साली भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापनेत सहभाग घेतल्यावर पार्टी स्प्लिट फॅमिली स्प्लिट हे whats app स्टेटस ठेवणाऱ्या सुप्रिया नंतर 'मविआ'ची सत्ता आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत खांद्याला खांदा लावून उभारल्या होत्याच," अद्वैत सांगतात.
 
सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची पहिला मुख्यमंत्री होऊ शकतात का प्रश्न त्या जेव्हापासून राजकारणात आल्या आहेत तेव्हापासून चर्चिला गेला आहे. शरद पवारांची कन्या, 'राष्ट्रवादी'सारख्या बहुतांश वेळेस सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्या, राजकीय जबाबदा-यांचा वाढता अनुभव आणि आजवर एकही महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात न होणं, ही त्यांच्या दावेदारीमागची मुख्य कारणं आहेत.
 
पण आजवर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. तशी वेळ आलीच तर संधी कोणाकडे असेल. ती संधी हीसुद्धा या दोघांमधली स्पर्धा मानली जाते. दोघांनाही हा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो तेव्हा दोघेही एकमेकांकडे निर्देश करुन ते मुख्यमंत्री झालेले आवडतील असं मोकळेपणानं सांगतात.
 
"ठाकरे आणि मुंडे यांच्या घरात काय घडलं हे बघता सुप्रिया केंद्रात आणि अजित पवार राज्यात या जाणीवपूर्वक केलेल्या कार्यक्षेत्र विभागणीमुळे अद्याप फूट पडलेली नाही. मात्र अधून मधून होणारी 'पहिली महिला मुख्यमंत्री' ही चर्चा महत्वाचं कारण असणार. यामुळं दुहीची चर्चा दबक्या आवाजात होत असते पण ती चव्हाट्यावर येत नाही हेही खरं," अद्वैत म्हणतात.
 
पवारांच्या निवृत्तीमुळे नवी संधी?
सुप्रिया सुळेंचं राजकारण हे अद्याप केंद्रात शरद पवारांच्या आणि राज्यात अजित पवारांच्या प्रभावातच होत राहिल्यानं त्यांना अद्याप हवी ती संधी सिद्ध करण्यासाठी मिळाली नाही असं म्हटलं जातं. बहुतांशी त्या कोणत्याही वादापासूनही लांब राहिल्या आहेत.
 
अनेकदा विरोधकांच्या आरोपांचे रोख कधी टूजी घोटाळ्यासंदर्भात, कधी आयपीएल गुंतवणुकीसंदर्भात त्यांच्याकडे वळले. पण त्याचा परिणाम फारसा झाला नाही.
 
पण आता पवारांच्या 'भाकरी फिरवण्याच्या' कृतीमुळे सुप्रिया सुळेंना त्यांच्यातलं नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल का?
 
"क्षेपणास्त्राची जोपर्यंत चाचणी होत नाही तोपर्यंत त्याची उड्डाणाची ताकद कळत नसते. तसं सुप्रियासुळेंच्या बाबतीत त्यांच्या क्षमतांची खरी परीक्षा आजवर झालेली नाहीय. शरद पवार स्वत:च या वयातही इतके सक्रीय असल्यानं आणि राष्ट्रीय राजकारणात कायम रिलेव्हंट राहिल्यानं सुप्रिया सुळे कायम दुय्यम भूमिकेतच दिसल्या आहेत."
 
"विरोधी असो की सत्ताधारी अनेकदा 6 जनपथवर सल्ला, मसलती, बैठकांसाठी येत असतात. त्यात फोटोमध्ये सुप्रिया सुळे पवारांच्या मागे बसलेल्या अनेकदा दिसतात. पण असे राजकीय पेच, पक्षांशी राजकीय बोलणी-तडजोडी याबाबत त्यांचं स्वत:चं कौशल्य दाखवण्याची संधी त्यांना मिळालेली नाहीय," प्रशांत कदम सांगतात.
 
"राज्यात स्वतंत्र मोकळीक असल्यानं अजितदादांना त्यांची स्वत:ची एक शैली निर्माण करता आली. तसं सुप्रिया सुळेंना दिल्लीत ती स्वतंत्र जागा अद्याप मिळालेली नाहीय. अर्थात उत्तम इंग्रजी, उत्तम हिंदी आणि स्वत:चे म्हणून काही अभ्यासाचे विषय त्यांनी विकसित केले आहेत. पण सोशल लाईफमध्ये जोडलेले उत्तम राजकीय संबंध त्या फायद्यातोट्याच्या स्वार्थी राजकीय मैदानात कसे टिकवतात हे पाहणं भविष्यातल्या काळात उत्सुकतेचं असेल," प्रशांत म्हणतात.
 
राज्यभर पसरलेल्या आणि राष्ट्रीय आकांक्षा असणाऱ्या पक्षाचं नेतृत्व करतांना अनेक क्षेत्रांमध्ये वावर आणि प्रसंगामध्ये निर्णयाची क्षमता असणं ही गरज असते. सुप्रिया सुळेंचा वावर हा दिल्ली-मुंबईतल्या राजकीय वर्तुळांबरोबर इतरही अनेक क्षेत्रांमध्ये दिसतो. तो चित्रपट, साहित्य, शैक्षणिक, सामजिक अशा क्षेत्रांमध्येही पहायला मिळतो.
 
पण सोबतच राजकीय निर्णय घेणं, धोरणं ठरवणं, पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत प्रसंगोचित राजकीय आघाड्या करणं, कार्यकर्त्यांची रसद पुरवत ठेवणं, निवडणुकांचं नियोजन करणं अशा प्रकारची आव्हानंही त्यात येतात. ही यादी यापेक्षाही मोठी असावी.

Published By -Smita Joshi