कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही.. प्रकाश आंबेडकर
शिवसेनेतील बंडखोरी आणि फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन्ही गट कोणाची ताकद अधिक हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच ठाकरे गटाला काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींनी पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना ते कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रकाश आंबेडकरांनी वंचितची भूमिका स्पष्ट केली. ते शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) यवतमाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही.”
Edited by : Ratnadeep Ranshoor