रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (08:34 IST)

‘सर्व शिक्षा अभियान’ या नावाने शासनाची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही – शिक्षण परिषदेचा खुलासा

सर्व शिक्षा अभियानासोबत नाम साध्यर्म असणारे http://shikshaabhiyan.org.in/index.php या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी, समग्र शिक्षा योजनेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी एका पत्राद्वारे केला आहे. यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारे वृत्त विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित झाले होते.
 
संबंधित (http://shikshaabhiyan.org.in/index.php) संकेतस्थळावर Sarva Shiksha Abhiyan Recruitment २०२१ या मथळ्याने Primary Teacher, Junior Teacher, Karyalaya Staff, Chaprasi या पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे संकेतस्थळावर दिसून येते.
 
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान केंद्र पुरस्कृत योजनेची सन २००२-०३ पासून सन २०१७-१८ पर्यंत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय या विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत होती.
 
सद्य:स्थितीत सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या पूर्वाश्रमीच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या एकत्रिकीकरणातून दिनांक ०१/०४/२०१८ पासून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी  या कार्यालयामार्फत राज्यात सुरू आहे. त्यामुळे सन २०१७-१८ (दि. ३१/०३/२०१८) नंतर सर्वशिक्षा अभियान या योजनेची वेगळ्याने अंमलबजावणी राज्यात सुरू नाही, असेही श्री.द्विवेदी यांनी या खुलाश्याद्वारे स्पष्ट केले आहे.