शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (09:11 IST)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : फडणवीसांनी पोलिस महासंचालकास ‘त्या’ ऑडिओ क्लिप पाठविल्या

Pooja Chavan
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एका 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. या संदर्भातील काही ऑडिओ क्लिप्स देखील सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणात सर्वंकश आणि सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात अनेक बाबी नमूद केल्या आहेत. पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण 12 ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत, त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय, त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत, असे पत्रात नमूद केले आहे.
 
फडणवीस यांनी पुढे लिहले आहे की, पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटत आहे. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे गरजेचे आहे. ही चौकशी तात्काळ करुन बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तात्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.