1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (09:13 IST)

पंतप्रधान मोदी गोदावरीच्या आरतीसह करणार काळारामाचे दर्शन!

Prime Minister Modi will have darshan of Kalarama with Godavari Aarti!
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी नाशिकमध्ये येत असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदाआरती होणार असून जगप्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनाला देखील जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये आता बदल झाला असून त्यांच्या कार्यक्रम आणि नाशिक मधील वास्तव्य हे आता वाढले आहे .त्यामुळे आता नरेंद्र मोदी दुपारी बारा वाजता नाशिकला आल्यानंतर या ठिकाणी सर्व साधारण ते नवीन दौऱ्याप्रमाणे तीन वाजेपर्यंत राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
 
पूर्वी नरेंद्र मोदी हे सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान नाशिकला येणार होते आणि त्यानंतर मोदी राष्ट्रीय युवक संमेलनाला संबोधित करून मुंबईकडे जाणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदललेल्या या नवीन दौऱ्याप्रमाणे आज बुधवारी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपयुक्त किरण चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन एकूण सर्व परिस्थितीचा आढावा घेतला त्यांच्याबरोबर पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आलेले अधिकारी पथक देखील हजर होते.
 
यावेळी त्यांनी पंतप्रधान रोड शो करणाऱ्या मिरची ते तपोवन रोड या भागाची पाहणी केली त्यानंतर हे सुरक्षा पथक गोदावरी नदीकिनारी आले त्या ठिकाणी दक्षिणेची काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची आरती पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्याबाबत सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्यात आला.
 
त्यानंतर हे पथक पोलिस आयुक्तांसह काळाराम मंदिर येथे गेले त्या ठिकाणची पाहणी करून तेथील आढावा घेतला गेला आणि सगळ्यात शेवटी हे पथक तपोवन येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवक संमेलनाच्या सभास्थळी गेले त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला आणि काही सूचना केल्या आहेत.
 
हजारो पोलिसांचा बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यासाठी राज्यभरातून पोलीस बोलविण्यात आले आहे. या पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था विविध मंगल कार्यालय आणि महानगरपालिकेच्या सभागृहांमध्ये करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप करणे यांच्या सूचनेवरून पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलिसांची व्यवस्था केली जात आहे. नाशिक शहरातील 800 पोलीस आणि राज्याच्या विविध भागातून सुमारे 2500 पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या आता नाशिकमध्ये पोहोचू लागल्या आहेत.  उद्या दुपारपर्यंत सर्व पोलीस हे नाशिकमध्ये हजर होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.