शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (23:19 IST)

महाराष्ट्रातल्या ‘ISIS मोड्यूल’वर NIA च्या कारवाईनं निर्माण केलेले प्रश्न

NIA
राष्ट्रीय तपास संस्था (NIA)नं 9 डिसेंबर 2023 रोजी इस्लामिक स्टेटच्या कथित हस्तकांना ताब्यात घेतल्याचं जाहीर केलं, तेव्हा साकीब नाचणचं नाव पुन्हा चर्चेत आलं तसंच काही प्रश्नही उपस्थित झाले.
ठाणे जिल्ह्यात भिवंडीजवळच्या पडघा-बोरिवली जिल्ह्यातून तपास यंत्रणांनी साकीबला अटक केली.
 
NIA, महाराष्ट्र पोलिस आणि ATS महाराष्ट्र यांनी ही संयुक्त कारवाई केली होती आणि 44 ठिकाणी छापे टाकून 15 जणांना ताब्यात घेतलं.
 
‘इस्लामिक स्टेट’ (दाएश किंवा ISIS) संघटनेच्या या ‘महाराष्ट्र मोड्यूल’चा साकीब हा स्वयंघोषित म्होरक्या असल्याचा दावा NIA नं एका प्रसिद्धीपत्रकात केला आहे आणि त्याच्यावर दहशतवादी कारवायांत सहभागाचा आरोप ठेवला आहे.
 
इतकंच नाही, तर साकिबनं आपलं पडघा-बोरिवली गाव हा एक ‘स्वतंत्र प्रदेश’ असल्याचं जाहीर केलं होतं, असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
 
साकिब नाचणवर असे आरोप केले जाण्याची आणि पडघा-बोरिवली गाव त्याच्यामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
 
साकीब नाचण कोण आहे?
2002-2003 मध्ये मुंबईत झालेल्या तीन बाँबस्फोटांप्रकरणी साकिब नाचणचं नाव चर्चेत आलं. पण 1990 च्या दशकापासूनच तो तपासयंत्रणांच्या रडारवर होता, त्याच्यावर दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली किमान 11 खटले चालले आहेत आणि साधारण 15 वर्ष तो तुरुंगातही जाऊन आला आहे.
 
63 वर्षांचा साकीब एकेकाळी ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महाराष्ट्रातला अध्यक्ष होता आणि नंतर या संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यानं काम केलं होतं.
 
1985 च्या आसपास साकिब नाचण आधी पाकिस्तानात आणि तिथून अफगाणिस्तानात गेल्याचा, अफगाण मुजाहिद्दीन लोकांशी संपर्कात असल्याचा आणि त्यानं खलिस्तानी दहशतवाद्यांना ट्रेनिंगसाठी मदत केल्याचा आरोप सीबीआयनं 1992 साली त्याच्यावर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केला होता.
 
साकिबला दहा वर्षांसाठी शिक्षाही झाली होती. 2000 साली तो तुरुंगातून बाहेर पडला.
 
गुजरात दंगलींनंतर मुंबईत तीन बाँबस्फोट झाले. आधी मुंबई सेंट्रल स्टेशन (6 डिसेंबर 2002), मग विले पार्ले मार्केट (२७ जानेवारी 2003) आणि मुलुंडला कर्जतकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये (13 मार्च 2003) झालेल्या त्या स्फोटांत किमान 15 जणांचा मृत्यू झाला.
 
या स्फोटांमागे एकच गट असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी ठेवला आणि आरोपींमध्ये साकिब नाचणचंही नाव होतं. पण मुंबई पोलिसांची टीम त्याला अटक करण्यासाठी पडघा-बोरिवली इथे गेली, तेव्हा आधी त्यांना रिकाम्या हातांनी परतावं लागलं.
 
पत्रकार-लेखक सय्यद हुसैन झैदी यांनी ‘डेंजरस माईंड्स’ या पुस्तकात तो किस्सा मांडला आहे.
 
पडघा-बोरिवली जेव्हा पोलिसांना भिडलं
पडघा हे ठाणे शहरात भिवंडीजवळचं नाशिक हायवेवरचं गाव. त्यालगतच असलेल्या सुमारे सात हजार लोकवस्तीच्या बोरिवलीत कोकणी मुस्लीम बहुसंख्य आहेत. इथेच साकीबचं कुटुंब राहतं. साकिब अकरा भावंडांमधला तिसरा.
 
त्यावेळी घाटकोपरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन पाकिस्तानी आणि एक काश्मिरी मारला गेला होता. हे तिघे अतिरेकी होते आणि त्यातल्या एकाकडील डायरीत साकिब नाचणनं मुंबईतल्या त्या हल्ल्यांसाठी मदत केल्याचा उल्लेख होता असा दावा पोलिसांनी केला होता.
 
मग प्रदीप शर्मा, दया नायक आणि सचिन वाझे हे पोलिस अधिकारी साकिब नाचणला अटक करण्यासाठी गेले होते. नाचणला गाडीत बसवलं जात होतं, तेव्हा त्यानं घोषणा दिल्या.
 
आसपासच्या गल्लीबोळांतून तरूण जमा झाले आणि पोलिसांसोबत मग त्यांची बाचाबाची सुरू झाली. गावातल्या वयस्कर लोकांनी मध्यस्थी केल्यानं पोलिसांना तिथून कसंबसं बाहेर पडता आलं, पण साकीब त्यांच्या हातून निसटला. पोलिसांनी त्यानंतरच्या काळात गावाची एकप्रकारे नाकाबंदी केली.
 
पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर अखेर साकिब नाचणनं शरण गेला. पोलिसांनी एकूण 13 जणांना तेव्हा अटक केली होती.
त्या प्रकरणात बेकायदा शस्त्रं बाळगल्यामुळे पोटा कायद्याखाली साकिबला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. 2017 मध्ये त्याची सुटका झाली होती.
 
त्यानंतर साकिबचं नाव ऑगस्ट 2023 मध्ये पुन्हा चर्चेत आलं, जेव्हा NIA पुणे-मुंबईतून दहा जणांना अटक केली होती. त्यावेळी ISIS चं ‘मोड्यूल’ चालवल्याच्या आरोपाखाली साकिबचा मुलगा शामिल नाचणला ताब्यात घेतलं होतं.
 
चार महिन्यांनी साकिबला अटक झाली आहे. त्याशिवाय हसीब झुबेर मुल्ला, काशिफ अब्दुल सत्तार बालेरे, सैफ अतीक नाचण, रेहान अश्फाक सुसे, शगफ शफिक दिवकर, फिरोज दस्तगीर कुवारी, आदिल इलियास खोत, मुसाब हसीब मुल्ला, रफिल अब्दुल लतीफ नाचण, याहया राविश खोत, राझिल अब्दुल लतीफ नाचण, फरहान अन्सार सुस, मुखलीस मकबूल नाचण आणि मुन्झिर अबुबकर कुन्नथपीडिकल यांना ताब्यात घेण्यात आल्याचं NIA नं जाहीर केलं आहे.
 
NIA नं काय म्हटलं आहे?
महाराष्ट्रातल्या या कथित इस्लामिक स्टेट मोड्यूलचा साकिब नाचण म्होरक्या असल्याचा आरोप NIA नं केला आहे.
 
नाचण या संघटनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना बयात म्हणजे ISIS च्या ‘खलिफा’शी निष्ठेची शपथ देत असे, असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
भारतात विध्वंसक आणि हिंसक कारवाया करणं, सामाजिक सलोखा भंग करणं आणि भारत सरकारविरोधात लढा पुकारणं अशा गोष्टींची योजना हे मोड्यूल तयार करत होतं, असं NIA नं म्हटलं आहे.
 
अटक केलेल्या आरोपींनी पडघा गाव हे एक ‘स्वतंत्र क्षेत्र’ आणि अल शाम (सीरियाचं एक नाव) असल्याचं जाहीर केलं होतं आणि आपला पडघ्यातला तळ मजबूत करण्यासाठी ते मुस्लिम तरुणांना इथे राहायला येण्यास प्रेरणा देत होते असा दावाही NIAनं केला आहे.
 
त्यांना अटक करताना एक पिस्टल, दोन एयर गन्स, आठ धारदार हत्यारं (तलवारी, चाकू), 68 लाख 3800 रुपये, दोन लॅपटॉप्स, सहा हार्ड ड्राईव्ह्ज, तीन सीडी, 38 मोबाईल फोन्स, 10 पुस्तकं-मासिकं आणि हमासचे 51 ध्वजही ताब्यात घेतल्याचं NIA च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
 
अटकेनंतर प्रश्न
याआधी जून ते ऑगस्ट 2023 दरम्यान ‘महाराष्ट्र ISIS मोड्यूल‘मधल्या 10 आरोपींना अटक केल्याचं NIA नं म्हटलं होतं आणि आता डिसेंबरमधल्या कारवाईत 15 जणांना अटक झाली आहे.
 
हे सगळेजण ISIS चे सदस्य असल्याचं NIA नं म्हटलं आहे, पण म्हणजे त्यांची या संघटनेत नेमकी भूमिका काय होती, याविषयी कुठली माहिती दिलेली नाही. त्यांचा नेमका कट काय होता, त्यांनी नेमकं कुणाला संघटनेत भरती करून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे कुठली स्फोटकं सापडली आहेत का याचीही माहिती अजून दिलेली नाही.
 
अनेक गोष्टी तपासाधीन आहेत, पण सध्या जाहीर केलेल्या माहितीवरून प्रश्नच जास्त निर्माण होताना दिसत आहेत.
 
माजी अतिरिक्त पोलिस उपायुक्त आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांचे जाणकार शिरीष इनामदार विचारतात, ’या कारवाईदरम्यान हमासचे 51 ध्वज मिळाले आहेत. एखादा कथित ISIS अतिरेकी हमासचे झेंडे बाळगतो आहो, असं मी इतक्या वर्षांत पहिल्यांदाच पाहिलं आहे. या कनेक्शनचा अर्थ काय?
 
‘केंद्रिय आणि राज्य गुप्तवार्ता विभाग, आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक यांच्या नजरेत अभिलेखावर असलेल्या संशयितांच्या हालचाली गेल्या सहा महिन्यात लक्षांत कां नाही आल्या?’ असा प्रश्नही ते विचारतात.
 
अटक झालेले आरोपी आधीपासूनच कारवायांमध्ये गुंतले होते आणि त्यांनी काळानुसार वेगवेगळ्या संघटनांच्या नावाखाली या कारवाया केल्या आहेत, असं एक माजी पोलिस अधिकारी स्पष्ट करतात. म्हणजे मग हे कथित आरोपी कथित इस्लामिक स्टेटच्या नावाचा ‘ब्रँड’सारखा वापर करत आहेत का, असाही प्रश्न निर्माण होतो.
 
इस्लामिक स्टेट (ISIS) आणि भारत
प्रामुख्यानं इराक आणि सीरियामध्ये उदयास आलेली जिहादी संघटना
2014 ते 2018 या काळात इराक आणि सीरियातील मोठ्या प्रदेशावर ताबा
हिंसाचार आणि कट्टरतावादामुळे कुप्रसिद्ध
2018 चं मोसूल युद्ध आणि 2019 मध्ये म्होरक्या अबु बक्र अल बगदादीच्या मृत्यूनंतर संघटनेचा प्रभाव कमी झाल्याचं दिसत असलं, तरी ती धोकादायक असल्याचं आणि भारतातही कारवाया करू शकत असल्याचं जाणकारांचं मत
अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2020 पर्यंत 66 भारतीय वंशाचे हल्लेखोर ISIS मध्ये सहभागी
NIA च्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2021 पर्यंत 168 जणांना ISIS शी संबंधित कारवायांसाठी अटक
 
Published By- Priya Dixit