श्रीराम सेनेची मान्यता रद्द, धर्मादाय आयुक्तांचा निर्णय
एकनाथ निमगडे आणि मनीष श्रीवास हत्याकांड श्रीराम सेनेचे रणजीत सफेलकरने घडवून आणल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर नागपूर पोलिसांनी सफेलकर आणि त्याच्या साथीदारांना अटकही केली होती. पोलिसांच्या पत्रानंतर धर्मादाय आयुक्तांनी रणजीत सफेलकरच्या श्रीराम सेना या संघटनेची मान्यता रद्द केली. याबाबत नागपूर पोलिसांनी माहिती दिली.
सफेलकर टोळी विरुद्ध मोक्कांतर्गत कारवाईही करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध खून, खंडणी, अग्निशस्त्र बाळगणे आदींसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी सफेलकर याच्या संघटनेची मान्यता रद्द करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविले होते. तसेच पत्रासह त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहितीही जोडली. त्याआधारावर कठोर पाऊल उचलण्यात आले असून धर्मादाय आयुक्तांनी रणजीत सफेलकरच्या संघटनेची मान्यता रद्द असून याबाबत माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, २८ एप्रिल रोजी राजमाने यांच्या नेतृत्वात कामठी नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सफेलकरचे राजमहाल नावाचे लॉन आणि सभागृह भुईसपाट केले आहे. सफेलकर हा तीन संस्थांमार्फत संचालित सात शाळांचा अध्यक्षही होता.