बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

माहितीचा अधिकार, लोकायुक्त आणि लोकपाल हे "ब्रम्हास्त्र" – अण्णा हजारे

शासकीय आणि  प्रशासकीय  कामकाजात पारदर्शकता आणणे, भ्रष्टाचार नष्ट करने,  गरीब पीड़ित जनतेला न्याय मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार सोबतच  लोकायुक्त आणि लोकपाल कायदा सुद्धा  ब्रम्हास्त्र  ठरणार आहे . कार्यकर्त्यांनी या तिन्ही कायद्याच्या  योग्य आणि कायदेशीर वापर करावा.  कायद्या वरच  लोकतंत्र टिकून आहे . कार्यकर्त्यांनी संघटित होवून लढ़ा दिला पाहिजे. त्यांच्या  प्रत्येक कार्यात माझा प्रत्यक्ष सहभाग आणि पाठिंबा नेहमीच राहिल असे मत अण्णाजी हजारे जेष्ठ समाजसेवक यांनी व्यक्त केले.
 
अहमदनगर  येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व असंघटित माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
 
या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माहिती अधिकार कार्यकर्ते हे माहिती अधिकाराची जन्मभूमी असलेल्या राळेगणसिद्धी येथे एकत्र झाले या मेळाव्याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या समस्या व विविध विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले गेले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे,  माहिती अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री सुभाष बसवेकर सर, जितेंद्र विंचू, श्री शेखर कोलते माहिती अधिकार महासंघ नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष,  माहिती सेवा समिती अध्यक्ष वरगुडे सर पुणे, उपस्थित होते.
 
मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विविध विषयावर मार्गदर्शन केले माहिती अधिकार कायदा हा अमलात आणण्यासाठी 2002 सालापासून कशा प्रकारे विविध आंदोलनातून आणि सरकार सोबत केलेल्या पाठपुराव्यातून माहिती अधिकार कायदा हा 2003 साली महाराष्ट्र मध्ये तर 12 ऑक्टोबर 2005 देशामध्ये कशाप्रकारे अमलात आणला गेला याविषयी केल्या गेलेला लढ्याची माहिती अधिकार कार्यकर्त्यांना जाणीव करून देण्यात आली. त्याचबरोबर सेवा हमी कायदा, दप्तर दिरंगाई कायदा आणि सरकारी नोकरीतील बदली याविषयी कायदा सरकारच्या पाठीमागे लागून अण्णांनी कशाप्रकारे तयार करून घेतले याविषयी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
 
माहिती अधिकार कायद्यात काम करत असताना माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एक व्यापक आणि मजबूत संघटन निर्माण करावे असे मत यावेळी अण्णा यांनी व्यक्त केले आणि जनतेने जर ठरवले की कोणतेही सरकार हे झुकवता येते कारण जनता जर जागृत असेल तर सरकार फक्त एकाच गोष्टीला घाबरते ते म्हणजे सरकार पडण्याला आणि जागरूक नागरिकांनी याच गोष्टीचा फायदा घेऊन सरकारला आपल्या मनासारखे वागायला आणि कायदे करायला भाग पाडला पाहिजे हे मत अण्णांनी अधोरेखित केले.
 
माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा आयोजक व सूत्रसंचालक राहुल कदम यांनी सदर कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडला सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून राहुल अवचट, अजय तुम्मे, शिवाजी खेडेकर, राजेंद्र निंबाळकर,  राळेगणसिद्धी येथील कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.