शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (15:20 IST)

अतिगंभीर बालकाला मृत्यूच्या दाढेतून वाचविले; “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या वैद्यकीय पथकाचे यश

जळगाव शहरातील तांबापुरा येथील रहिवासी असलेल्या दहा वर्षीय बालकाला मेंदूज्वरासह विविध आजार जडल्याने तसेच नमुना घेतला असताना तो कोरोना पॉझिटिव्हदेखील आल्याने त्याची प्रकृती अतिगंभीर झाली होती. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करीत त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. सोमवारी ३१ जानेवारी रोजी त्याला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेतील अतिगंभीर असलेला बालरोग वर्गातला तो पहिला रुग्ण होता.
 
साहिल अरमान तडवी (वय १०, रा. तांबापुरा, जळगाव) याची घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याला झटके येत असल्याने तसेच ताप आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १२ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. त्याची बालरोग विभागाच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली. त्याला मेंदूज्वर, न्यूमोनिया असल्याचे तसेच पोटात रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. हृदयाचे ठोके मंद, रक्तदाब खालावला तसेच झटके देखील येत असल्याने त्याची प्रकृती अतिगंभीर झाली.
 
नमुना तपासणी केली असता तो कोरोनाबाधित देखील आला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्याला जुना अतिदक्षता विभागात तातडीने दाखल करण्यात आले. तेथे सलग दहा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यांनंतर तो पूर्वपदावर येऊ लागला. त्याची परिस्थिती नियंत्रणात आली. त्याला ‘आयव्हीआयजी इम्युनो’ हे महागडे औषधदेखील उपलब्ध करून देण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला कक्ष क्रमांक ४ येथे वैद्यकीय पथकाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले होते. महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे साहिलवरील उपचार मोफत झाले.
 
सोमवारी ३१ जानेवारी रोजी त्याला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ.विजय गायकवाड यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. साहिलवर उपचार करण्यासाठी औषधवैद्यकशास्त्र, बधिरीकरणशास्त्र विभागाचे आंतरविभागीय समन्वयन घेण्यात आले.
 
साहिलवर उपचार करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक डॉ. गिरीश राणे, डॉ. शिवहर जनकवाडे, डॉ. स्नेहल पल्लोड, डॉ. विश्वा भक्ता, डॉ. निलंजना गोयल, डॉ. अतुल गाजरे, डॉ. सागर बिर्हारी यांच्यासह जुना अतिदक्षता विभाग इन्चार्ज परिचारिका कल्पना धनगर, कक्ष ४ च्या इन्चार्ज सिस्टर संगीता शिंदे, कक्ष १४ च्या इन्चार्ज सिस्टर माया साळुंखे यांच्यासह वैद्यकीय पथकाने उपचार केले.