शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:36 IST)

परदेशात शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती;६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार

Scholarship from Tribal Development Department for study abroad; Applications can be submitted till 6th September Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते.कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता आदिवासी विकास विभागाकडून या शिष्यवृत्तीसाठी आवेदनपत्रे सादर करण्याची मुदत ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.असे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
 
प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, परदेशातील विविध विद्यापीठात अनेक नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याच हेतूने,आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशा दहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आदिवासी विकास विभाग त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. तथापि, ज्या परदेशी विद्यापीठांचे जागतिक रँकिंग ३०० पर्यंत आहे, त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याना ही शिष्यवृत्ती देय असणार आहे.
 
या शिष्यवृत्तीमध्ये आदिवासी विकास विभाग परदेशातील ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे, त्या विद्यापीठास ऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यापीठाच्या खात्यावर ट्युशन फी आणि परीक्षा फी जमा करणार असून विद्यार्थ्याचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. निर्वाह भत्त्यामध्ये निवास आणि भोजन खर्च याचा समावेश असेल. याव्यतिरिक्त विमानप्रवास खर्च, व्हिजा फी, स्थानिक प्रवास भत्ता, विमा आणि संगणक अथवा लॅपटॉप यांचा खर्च विद्यार्थ्याने स्वत: करावयाचा आहे.असेही आदिवासी विकास विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी कळविले आहे.
 
हे विद्यार्थी पात्र ठरतील
विद्यार्थ्याचे वय जास्तीत जास्त ३५ असावे.
नोकरी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा ४० असेल.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६.०० लक्ष इतकी असेल.
परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक TOEFL किंवा IELTS या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष विचार यात केला जाईल.
भूमिहीन आदिवासी कुटुंबातील , दुर्गम भागातील व आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यास प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य असणार आहे.
सर्व अपर आयुक्त कार्यालये आणि सर्व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये तसेच https://tribal.maharashtra.gov.in येथून  आवेदनपत्राचा नमुना उपलब्ध करून घ्यावा.
यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेले आवेदन पत्र आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये येथे दिलेल्या मुदतीच्या आत जमा करावीत.