महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन कोण करणार या प्रश्नांचं उत्तर अजूनही मिळालं नाहीये. मात्र 9 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत असल्यानं राजकीय घडामोडींना मात्र वेग आला आहे.
				  													
						
																							
									  
	 
	राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईला येत आहेत. शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दौऱ्यावर होते. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते आपला दौरा अर्धवट सोडून येत असल्याची चर्चा होती. मात्र एनसीपीच्या सूत्रांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हे 8 नोव्हेंबरलाच मुंबईत येणं अपेक्षित होतं.
				  				  
	 
	शुक्रवारी (8 नोव्हेंबर) भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही त्यासाठी मुंबईत येणार आहेत.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	विधानसभेची मुदत संपणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तांत्रिकदृष्ट्या आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. अंतिम मुदतीपर्यंत सरकार स्थापनेची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. नवं सरकार बनेपर्यंत देवेंद्र फडणवीसच काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात.
				  																								
											
									  
	 
	दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपकडे बहुमत असेल तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनावं. काळजीवाहू म्हणून सूत्र हलवू नये. हा जनादेशाचा अपमान असेल, असं वक्तव्य केलंय
				  																	
									  
	 
	शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांसोबत महत्वाची बैठक होणार आहे. शिवसेना भवन इथं दुपारी बारा वाजता ही बैठक पार पडेल.
				  																	
									  
	 
	भाजपकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न- विजय वडेट्टीवार
	दुसरीकडे, काँग्रेसच्या गोटातही वेगानं हालचाली केल्या जात आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी जमले आहेत. तिथून या आमदारांना जयपूरला हलविण्यात येण्याची शक्यता असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. "सत्तेसाठी कुठल्याही थराला हे राजकारण जाऊ शकतं. अनेकांना भाजपकडून प्रलोभनं दिली जात आहेत," असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
				  																	
									  
	 
	"शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटीची ऑफर दिल्याचा आरोप शिवसेनेने केला. हे माध्यमांसमोर आलं म्हणून आम्ही आमच्या आमदारांना असा कुठला फोन आला तर तो रेकॉर्ड करायला सांगितलं आहे. आम्हाला हे लोकांसमोर आणायचं आहे." असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं. "आम्ही कोणत्याही आमदाराला आम्ही कुठे हलवलं नाही. काही आमदार जयपूरला गेले असतील तर ते फिरायला गेले असतील. त्याबाबत आम्हाला काही माहिती नाही," असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.
				  																	
									  
	 
	सत्ता स्थापनेचा दावा नाहीच
	निवडणुकीत 105 जागा जिंकलेला भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी त्याला 56 जागा जिंकलेल्या शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करणं आणि चालवणं शक्य नाही.
				  																	
									  
	 
	लोकसभा निवडणुकीच्या वेळी युती करताना जे ठरलं ते द्या, असं म्हणत मुख्यमंत्रिपदाची मागणी करुन शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडलं आहे. तसंच शिवसेनेला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचंही संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पण शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याबाबत स्वतः कोणत्याही हालचाली अद्याप केलेल्या नाहीत.
				  																	
									  
	 
	दरम्यान, गुरुवारी (7 नोव्हेंबर) वेगवान राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेनेनं सकाळी 11 वाजता आपल्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्यास भाजपशी कोणतीही चर्चा करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती सहभागी आमदारांनी दिली.
				  																	
									  
	 
	दुपारी भाजपचे चार नेते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना जाऊन भेटले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी सत्तास्थापनेच्या कायदेशीर तरतुदींबाबत राज्यपालांकडून माहिती घेतली. पण सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही.