शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (07:41 IST)

शिवाजी विद्यापीठातील वसतिगृह सुरू होणार

शिवाजी विद्यापीठातील दहा वसतगृह आजपासून सुरू होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासंदर्भातील पत्र अधिविभागप्रमुखांना वसतिगृह अधीक्षक पाठवणार आहेत, अशी माहिती वसतिगृह अधिक्षक डॉ. एस. पी. हंगिरगेकर यांनी दिली.
 
शिवाजी विद्यापीठातील दहा वसतिगृह तब्बल दोन वर्षांनी सुरू होणार आहेत. त्यामुळे अधिविभागात शिक्षण घेणाऱया परगावच्या जवळपास 3 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. वसतिगृहात राहून प्रत्यक्ष अध्ययन आणि प्रॅक्टीकल करण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. तसेच पीएच. डी. शोधप्रबंध व संशोधन प्रकल्प पूर्ण करणे सोयीचे जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या या निर्णयाचे अभिनंदन विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून वसतिगृह ताब्यात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, बेडची देखभाल दुरूस्ती अशी सर्व तयारी केली आहे. त्याचबरोबर विद्यापीठातील सर्व वसतिगृहांचे खानावळ चालकाबरोबर करार झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या राहण्याचा व जेवणाचा प्रश्न मिटणार आहे. वसतिगृहा सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी विद्यापीठ परिसर विद्यार्थ्यांची गजबजणार आहे.
 
डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन
डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनमध्ये ‘कमवा व शिका योजने’ अंतर्गत गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. त्याबदल्यात विद्यार्थ्यांना दररोज तीन तास काम करावयाचे आहे. सध्या 300 पेक्षा जास्त मुला-मुलींचे अर्ज आले आहे. मुलाखती घेवून त्यापैकी 200 मुला-मुलींना भवनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.