1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (23:11 IST)

SSC CET:अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द

SSC CET: CET for 11th admission canceled by High Court
अकरावी प्रवेशासाठीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाने रद्दबातल ठरवला आहे. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाने रद्द केली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात 28 मे रोजी अध्यादेश काढला होता.
 
ही सीईटी राज्य शिक्षण मंडळाच्या (SSC) अभ्यासक्रमावर घेण्यात येणार होती. त्यामुळे सीबीएसई आणि आयसीएसई शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांनी या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
 
या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असतं असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
 
यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने हा निर्णय रद्द केल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.
 
सीईटी परीक्षा ही एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होणार होती. त्यामुळे इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्याने यासंदर्भात उच्च न्यायालयात आव्हान दिलं.
 
या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असता असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.
 
ऐनवेळी दुसऱ्या बोर्डाचा अभ्यास करुन सीईटी कशी देणार असा प्रश्न सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
 
खरं तर सीईटीचा निर्णय अनेक कारणांमुळे वादात अडकला होता. पहिलं कारण म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर पुन्हा प्रवेश परीक्षा का घेतली जात आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
 
या परीक्षेत मराठी विषयाचा समावेश न केल्याने मराठी संस्थाचालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.
 
त्यामुळे आता अकरावीचे प्रवेश दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे होतील. यामुळे प्रवेशाची स्पर्धा वाढणार हे स्पष्ट आहे. कारण यंदा परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले आहेत. त्यामुळे प्रवेश गुणवत्ता यादीत कट ऑफ वाढू शकतो.
 
काय होता निर्णय?
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने अकरावीचे प्रवेश गुणवत्ता यादीनुसार व्हावेत यासाठी राज्य सरकारने सीईटी परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला होता. ही सीईटी परीक्षा जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
 
. निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती
 
ही परीक्षा वैकल्पिक असून सीईटीला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी मात्र प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे स्पर्धात्मक महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटीच्या माध्यमातून प्रवेशाची जागा सुरक्षित करता येणार आहे. असं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं.
 
गेल्यावर्षी राज्यात कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीसाठी 32 टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही दहावीचे विद्यार्थी प्रवेशासापासून वंचित राहणार नाहीत असं आश्वासन शिक्षण विभागाने दिलं होतं.
 
कशी असेल सीईटी परीक्षा?
अकरावी प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा एसएससी बोर्ड, सीबीएसई, सीआयएससीई आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.
 
ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नाही. परंतु अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल.
सीईटी परीक्षा एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
 
परीक्षा 100 गुणांची असेल. OMR पद्धतीने परीक्षा होणार असून दोन तासांची परीक्षा असेल.
 
इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील.
 
ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे.
 
परीक्षा केंद्रांची यादी एसएससी बोर्ड किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.
 
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना सीईटीसाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार नाही. एसएससी बोर्ड वगळता इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र शुल्क भरावे लागणार आहे.