मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (14:28 IST)

ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांचं वस्त्रहरण करतील : मनसे

Manse MNS flag
मनसेने दसरा मेळाव्यात विचार नाही, तर नाटकं पहायला मिळतील अशी टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांचं वस्त्रहरण करतील अशी टीका केली आहे. दोन्ही गटाला समर्थन देणाऱ्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे असंही ते म्हणाले.
 
“पहिल्यांदाच असं होणार आहे की, ज्यांचे जास्त लोक असतील तेच खरी शिवसेना असं ठरणार आहे. विचार ऐकायला कोणीच येणार नाही. आज विचारांना काहीच महत्त्व नाही, येथे वस्त्रहरणच होणार आहे. सोनं वैगेरे नाही, एकमेकांच्या अंगावरील चिंध्याच गोळा कराव्या लागतीत अशी परिस्थिती आहे, दोन्ही मेळावे यशस्वी होणं हे आयोजकांपेक्षा त्यांच्या मागे जी शक्ती त्यांची मोठी गरज आहे. त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे,” असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
 
“उद्या शिवतीर्थावरील मेळावा यशस्वी झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा कमी होणार आहे. पण यशस्वी झाल्यास नैतिक धैर्य वाढेल. बीकेसीतील मेळावा यशस्वी झाला नाही तर भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागेल, त्यामुळे हे मेळावे यशस्वी करण्याची गरज त्या संयोजक, आयोजकांपेक्षा इतरांना जास्त आहे. यावरच महाराष्ट्राचं राजकारण ठरणार आहे. अंधेरी विधानसभा निवडणूक, मुंबई कोणाच्या हातात जाणार यासाठी दोन्ही गटांच्या मागे असणारी शक्ती मेळावे यशस्वी व्हावेत यासाठी प्रयत्न करतील,” असा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor