शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (08:25 IST)

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून कांदा अग्निडाग कार्यक्रमासाठी दिले निमंत्रण

kanda invitation
येवला  :- मुख्यमंत्री,आपण शेतकऱ्याचे चिरंजीव आहात. या नात्याने शेतकऱ्यांच्या समस्या बाबत आपण गप्प न बसता तुम्ही शेतकऱ्यांबाबत आवाज उठवायला पाहिजे.
भाजप सरकारला याबाबत काही घेणे दिले नाही. तुम्ही नेहमी दिल्ली दौरा करीत असता एखादा दौरा शेतकऱ्यासाठी केला पाहिजे. आपण काही करू शकत नसाल तर किमान मी ठेवलेल्या कांदा अग्निडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आग्रहाचे निवेदन येवला तालुक्यातील नगरसुल येथील कृष्णा भगवान डोंगरे या शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या रक्ताने लिहिल्या या पत्रात म्हटले आहे.
 
सध्या कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी येवला तालुक्यातील नगरसुल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आज वाघासारख्या जगणाऱ्या शेतकऱ्याला राजकारण्यांमुळे कुत्र्यासारखं मरण पत्करावा लागत आहे.
 
आज शेतकऱ्यापुढे लाईट, हमीभाव, सिंचन, आरोग्य, शिक्षण, मुला-मुलीचा विवाह असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आज शेतकऱ्याला कांदा रडवतोय, राजकारणी मात्र सत्ता संघर्षात धुंद आहेत. आज कांद्याचा खर्च निघत नसून एकरी पन्नास हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. शेतकरी विरोधी केंद्रातले भाजप सरकार यांना याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहेत, या नात्याने आपण आवाज उठवला पाहिजे होता पण आपण गप्प का? याचे उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की विचारेल.
 
खरंतर आपण दिल्ली दौरा दोन दिवसात करत आहात. एखादा दौरा शेतकऱ्यांसाठी केला पाहिजे. असो आपणाकडून काही अपेक्षा नाही. मी हे पत्र माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहीत आहे. आपणास हात जोडून विनंती आहे की,आपण काही करू शकत नसाल तर किमान मी ठेवलेल्या कांदा अग्निडाग कार्यक्रमास आवर्जून हजर राहावे. असे आग्रहाचे निमंत्रण कृष्णा भगवान डोंगरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
 
दरम्यान कृष्णा डोंगरे यांनी कांदा अग्निडाग समारंभ बाबत लग्नपत्रिका ही तयार केली आहे. या पत्रिकेत सोमवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कांदा अग्निडाग समारंभ होणार असल्याचे कृष्णा डोंगरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्र व हितचिंतकांना या पत्रिकेद्वारे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor