बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जानेवारी 2024 (10:20 IST)

पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्रातच राहणार

uday samant
राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने होत आहे. सत्ताधा-यांवर टीका करताना महाविकास आघाडीकडून वेदांता फॉक्सकॉनपासून ते विविध प्रकल्पावरुन निशाणा साधला जात आहे. त्यातच आता राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला होता. सिंधुदुर्गातील हा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाईल, असे नाईक यांनी म्हटले होते. त्यावर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण देत सदर पाणबुडी प्रकल्प राज्यात राहणार असल्याचा खुलासा केला आहे. यावेळी, त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचाही संदर्भ दिली.
 
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आरोप केला की, सिंधुदुर्ग किना-यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाईल. २०१८ मध्ये पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्र विभागाच्या पर्यटन खात्याने सिंधुदुर्गात आणला होता. त्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या प्रकल्पाला निधीची तरतूद केली होती. मात्र, आता या प्रकारचे चांगले प्रकल्प गुजरातला नेण्याचा गुजरात शासन आणि केंद्र सरकारचा डाव आहे. हा डाव समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ३ मंत्री राज्य सरकारमध्ये आहेत. १ मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे. असे असताना हा प्रकल्प गुजरातला नेणे म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी केल्यासारखे आहे अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर, आता मुख्यमंत्र्यांनी तो प्रकल्प महाराष्ट्रात राहणार असल्याचे स्पष्ट केले.
 
पाणबुडी प्रकल्प आपल्याच राज्याचा आहे, तो राज्याबाहेर जाणार नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी माझी चर्चा झाली असून दीपक केसरकर इथे माझ्यासोबतच आहेत असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणबुडी प्रकल्प गुजरात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, विरोधकांच्या काळात कामे ठप्प होती, त्यामुळे त्यांना आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
Edited by -Ratnadeep Ranshoor