शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (15:08 IST)

ठाणे – बोरिवली भूमीगत मार्ग प्रकल्प ११.८ किमी लांबीचा मार्ग असेल

link road
आज घडीला ठाणे येथून बोरिवलीला जाण्यासाठी सव्वा ते दीड तास लागतो. वर्दळीच्या वेळी या प्रवासासाठी दोन तास लागतात. या पार्श्वभूमीवर प्रवासी-वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आणि हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठाणे – बोरिवली भूमीगत मार्ग प्रकल्प हाती घेतला. पण पाच वर्षात हा प्रकल्प एमएसआरडीसीला मार्गी लावता न आल्याने २०२१ मध्ये राज्य सरकारने हा प्रकल्प एमएमआरडीएकडे  हस्तांतरित केला.
 
हा प्रकल्प एमएमआरडीएकडे आल्यानंतर कामास सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र  हा मार्ग जंगलातून जात असल्याने पर्यावरण, वन्यजीवांना धोका पोहचू शकतो ही बाब लक्षात घेऊन सरकारने प्रकल्पाविषयी पुन्हा अभ्यास करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले होते. अभ्यासाअंती तयार करण्यात आलेल्या  सुधारित आराखड्याला मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत वेळ गेल्याने प्रकल्पाचे काम रेंगाळले.  पण आता मात्र एमएमआरडीएने या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा जारी केल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आता लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
 
एमएमआरडीएच्या निविदेनुसार ११.८ किमीचा हा भूमीगत मार्ग आणि यातील १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे अशा कामांसाठी दोन निविदा मागविण्यात आल्या आहेत. ही निविदा प्रकिया येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण करून पावसाळ्यात प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. सहा-सात वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. मात्र ठाणे – बोरिवली अंतर केवळ २० मिनिटात पार करण्यासाठी मुंबईकरांना आणि ठाणेकरांना पुढची पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
 
ठाणे – बोरिवली भूमीगत मार्ग
११.८ किमी लांबीचा मार्ग
मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे
दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार
सहा मार्गिका (येण्यासाठी तीन-जाण्यासाठी तीन)
११,२३५.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित
पाच वर्षांत काम पूर्ण करणार
हा मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास केवळ २० मिनिटांत बोरिवली येथून ठाणे गाठता येणार.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor