मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सांगलीतील हिसडा गँगचा चोरटा निघाला राधानगरीचा !

arrest
सांगलीत काही दिवसापासून सलग हिसडा मारून सोन्याचे दागिने पळविणाऱ्या आणि महिला वर्गात दहशत निर्माण केलेल्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली. उत्तम राजाराम बारड हा अवघ्या तिशीतील चोरटा धामोड, ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्याच्याकडून साडेसहा तोळे सोन्यासह एक दुचाकी असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सांगलीतील शंभरफुटीसह मौजे डिग्रज, इचलकरंजी, जैनापूर अशा सात ठिकाणच्या चोरीची त्याने कबुली दिली आहे.
 
चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीत स्थानिक किती आणि बाहेरगावहून आलेले गुन्हेगार किती आहेत याची माहिती काढण्याची जबाबदारी आता सांगली शहर पोलिसांवर आली असून या पोलीस ठाण्याकडे त्याला वर्ग करण्यात आले आहे. हिसडा टोळीला पकडण्यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील पथक निर्माण केले आहे. जेथे जेथे हे गुन्हे घडले तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यातच हवालदार सागर लवटे आणि नाईक सागर टिंगरे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार बारड हा कुपवाड रोडवर सूतगिरणी चौकात चोरीचे दागिने विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. सूतगिरणी चौक परिसरात या पथकाने सापळा रचला त्यात उत्तम बारड अडकला. पँटच्या खिशात चोरीचे दागिने मिळाले. शिवाय मोटार सायकलही चोरीची असावी अशा पध्दतीने त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अटक करून त्याचा ताबा सांगली शहर पोलीस ठाण्याकडे देण्यात आला आहे. त्याच्याकडून एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.