शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (21:19 IST)

'हे' प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे :फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेंकडे ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच ३ महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.