1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 12 जुलै 2021 (09:59 IST)

नाशिकच्या गिर्यारोहकाने शोधून काढला नगर जिल्ह्यातील हा किल्ला

This fort in Nagar district was discovered by a mountaineer from Nashik Maharashtra News Nagar Fort News in marathi Maharashtra News Regional Marathi News In Marathi webdunia marathi
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सपाट पठारी भागावर अनेक ऐतिहासिक भुईकोट किल्ले, गढी आणि वेसयुक्त गावे आहेत.परंतु त्यावर आता नव्याने भर पडली आहे ती एका गिरिदुर्गाची. नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप येथील अप्रकाशित अशा भोरवाडी किल्ल्याचा शोध घेतला आहे.

हरिश्चंद्र गडापासून सह्याद्रीची उपरांग थेट पारनेर शहराच्या दिशेने जाते. पारनेरच्या दिशेने जाताना ह्या उपरांगेची उंची कमी होत जाते. त्यावरील मांडओहोळ धरणाजवळील म्हसोबाझाप ग्रामपंचायतीतील भोरवाडी येथील किल्ला आतापर्यंत अप्राशित होता. नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी परिसरात असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती आणि अभ्यास करत असताना भोरवाडी किल्ल्याचा शोध घेतला.या किल्ल्याचे भौगोलिक स्थान 19.231835,74.287812 असून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी नाशिक – पुणे महामार्गावरील बोटा या गावापासून पूर्वेकडे (लागणाऱ्या रस्त्याहून केलेवाडी, कटाळवेढे, शिंदेवाडी मार्गे) म्हसोबा झाप या गावाची भोरवाडी वस्ती – २४ कि.मी. अंतरावर येते.

अहमदनगरहून पश्चिमेकडे कल्याण महामार्गावरून (भलावणी – टाकळी ढोकेश्वर – कर्जुले हरेश्वर – मांडओहोळ धरण मार्गे) म्हसोबा झाप भोरवाडी  – ६० कि.मी. तर पारनेर या तालुक्याच्या ठिकाणाहून (कान्हुर – टाकळी ढोकेश्वर – कर्जुले हरेश्वर – मांडओहोळ धरण मार्गे) म्हसोबा झाप भोरवाडी – 38 कि.मी. अंतरावर आहे. भोरवाडी किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची – २८२४ फूट (८६० मी) असून किल्ल्याची चढाई सोप्या श्रेणीची आहे.
 
म्हसोबाझाप गावाच्या १२ वाडी आहेत. पैकी कण्हेरवाडी आणि भोरवाडी गावातून किल्ल्यावर जाता येते. परिसरातील लोक या किल्ल्याच्या टोकदार निमुळत्या आकारामुळे त्याला चुचुळा या नावाने संबोधतात. भोरवाडी गावातून मुख्य किल्ला व त्यालगत असलेला छोटा डोंगर यांच्या खिंडीतून वर चढाईचा मार्ग आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंतची चढाई ही फक्त ११० ते १२० मीटरची आहे. किल्ल्यावर चढाई मार्गात खडकातून खोदीव मार्ग आणि अनेक पायऱ्या कोरलेल्या दिसून येतात. चढाई मार्गावर तटबंदीचे चीरे ओळीने दिसून येतात. त्यातून प्रवेशद्वार असावे अशी रचना दिसून येते. तटबंदीचे जोते आणि पायऱ्यांजवळ ओळीने छोटे गोलाकार छिद्रे कोरलेली दिसून येतात.

माथ्यावरील सपाटीच्या भागावर गडफेरी करता येते. पूर्वेकडील भागावर दोन पाण्याचे खोदीव टाके आहेत. हे दोन्ही टाके २६ फूट लांब तर १० फूट रूंद आहे. दोन्ही टाके सुमारे १० फुटा पेक्षा अधिक खोलीचे आहेत. त्यातील एक टाके माथ्याकडून वाहून आलेल्या माती-गाळाने अर्धे बुजलेले आहे. माथ्याच्या उत्तरेकडे पाण्याचे तिसरे टाके असून ते देखील २६ फूट लांब व १० फूट रूंद आहे. परंतु आजच्या स्थितीला हे टाके पूर्णपणे मातीने भरलेले आहे. सर्वोच्च माथ्यावर नैसर्गिकरीत्या पडलेले अनेक मोठे दगड आहेत. त्यावर स्थानिक ग्रामस्थांनी चकाकणारे स्फटिकाचे छोटे दगड ठेवून त्याची बांगड्या, हळद-कुंकू वाहून पूजा केलेली दिसते. स्थानिक लोक याला माऊलाई देवी नावाने पुजतात. दरवर्षी नागपंचमीला येथे यात्रास्वरूप आलेले असते. म्हसोबाझाप गावच्या ठाकरवाडीतील लोक देवीला कुलस्वामिनी मानतात.