रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करणार : हसन मुश्रीफ
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरुन किरीट सोमय्या यांनी आरोप केले असा दावा करत रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करणार आहे, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांच्यावर हायब्रीड ॲन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करणार आहे. राज्यातील ९० टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार देखील पळून गेले आहेत. यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. तसंच, कायदेशीर सल्ला घेऊन ACB कडे तक्रार दाखल करणार, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
हायब्रीड ॲन्यूईटीमध्ये तीस हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष ६० टक्के आणि उरलेल्या दहा वर्षांमध्ये ४० टक्के अशी ती योजना होती, त्याचं टेंडर निघालं आणि ती कामं पूर्ण होत आहेत. हॅब्रीड ॲन्यूईटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. जर त्यात काही समस्या होत्या तर ती पूर्ण करुन जनतेचा आशीर्वाद का मिळवला. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही, असं थेट आव्हान त्यांनी मुश्रीफांना दिलं, मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी २५ टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.