शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: ठाणे , शनिवार, 22 एप्रिल 2017 (11:21 IST)

२० दिवसांनंतर राज्यातील पहिला टोलनाका टोलमुक्त होणार

राज्यातील पहिला टो नाका भिवंडी बायपासवरील खारेगाव नाक्यावर आहे. या टोलचे कंत्राट संपले असून २० दिवसानंतर हा नाका टोलमुक्त होणार आहे. १५ वर्षांच्या कार्यकाळात या टोलनाक्याने सुमारे ४९० ते ५१० कोटी रूपयांची वसुली केली आहे.  हा रस्ता उभारणी आणि १५ वर्षांतील देखभाल दुरूस्तीचा खर्च १८० कोटी ८३ लाख रूपये होता.
 
सर्वाधिक टोलनाक्यांचा जिल्हा अशी ठाण्याची ओळख असून या जिल्ह्यात जवळपास १८ टोलनाके आहेत. त्यातला पहिला टोल नाका हा मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या भिवंडी बायपास रोडवरील खारेगाव येथे उभारण्यात आला होता. केवळ ठाणे जिल्ह्यातलाच नव्हे तर राज्यातला हा पहिला टोल नाका होता. आयआरबी या कंपनीने या रस्त्याची बांधणी केली होती. त्या मोबदल्यात त्यांना रस्त्यावर टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती. वास्तविक १९९८ सालापासूनच या रस्त्यावर टोलवसुलीला सुरूवात झाली होती. मात्र, अधिकृत अधिसूचना २००२ साली काढण्यात आली होती.
 
या रस्त्याची बांधणी आणि देखभाल दुरूस्तीच्या खर्चाची आर्थिक सांगड घालून १५ वर्षांसाठी आयआरबी कंपनीला या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांकडून टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती. रस्ता बांधकामाचा खर्च आणि १५ वर्षातील देखभाल दुरूस्तीवर कंपनीने सुमारे १८० कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र, व्याज आणि अन्य विविध कारणांपोटी वाढीव टोलवसुलीची परवानगी टोलच्या करारामध्ये देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे ४९० ते ५१० कोटींपर्यंत वसुली गेल्याचे कंपनीच्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.