1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (22:04 IST)

अभ्यास करा, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे ऑनलाईन युट्यूब चॅनल सुरु

University of Health Sciences
लॉकडाऊनच्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ऑनलाईन युट्यूब चॅनल सुरु केले असून, ‘झूम’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चरची सुविधाही उपलब्ध करुन दिल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना दिली.

राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंशी संवाद साधत शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

आरोग्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रमाशी संबंधित ऑनलाईन लेक्चर्स उपलब्ध करुन दिले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात माहिती, तंत्रज्ञान व कम्युनिकेशनचा प्रभावी वापर केला जात असून, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि क्लाऊड सर्व्हरवर 700 पेक्षा अधिक रेकॉडेड लेक्चर, पॉवर पॉईन्ट सादरीकरण अपलोड केले आहेत. झूमद्वारे लाईव्ह लेक्चर दिले जातात. याचा विद्यार्थी व शिक्षकांना फायदा होणार असून, ऑनलाईन शिक्षणासाठी एमयूएचएच लर्निंग नावाचे युट्यूब चॅनल सुरु केले आहे. आजवर तीस हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतल्याचे कुलगुरु डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने ऑमनिक्युरस संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. त्याचा विद्यार्थी व शिक्षकांना अद्यावत ज्ञान मिळवण्यासाठी उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.