1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 जुलै 2022 (13:00 IST)

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यात अलर्ट जारी

torrential rains
राज्यात पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून  मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मुंबईत पहिल्यांदाच मुसळधार म्हणावा, असा पाऊस (Rain)कोसळला. त्यामुळे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पाणी साचणे, लोकल ट्रेनचा खोळंबा, रस्त्यांना तलावाचे स्वरुप येणे, असे नित्याचे दृश्य पाहायला मिळाले. आज सकाळपासूनही मुंबईत पाऊस लागून राहिलेला आहे. त्यामुळे दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर दुसरीकडे पावसाचा सध्याचा रागरंग पाहता लोकल ट्रेन्सचाही खोळंबा होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत तब्बल 163 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.हवामान खात्याकडून महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा दिला आहे
 
सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे., कोकणपट्ट्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहेत. तर मुंबईत पाच दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट देण्यात आला आहे.