गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (16:24 IST)

पावनखिंड एक वीरभूमी

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील पावनखिंड या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा आहे. पन्हाळगडाला सिद्दी जौहरने वेडा घातला होता. शिवाजी महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले आणि सिद्दी जौहरने वेढा ढिला केला. इकडे शिवरायांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि एका पालखीत ते स्वत: तर दुसऱ्या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोहोचविली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला.
 
राजे विशाळगडच्या दिशेने निघाले आणि मसूद त्यांच्या पाठलागावर होता. घोडखिंडीत आम्ही शत्रूला थांबवितो आपण विशालगडाकडे रवाना व्हा असं बाजीप्रभू देशपांडेनी राजेंना सांगितलं त्याच घोडखिंडीत मसूद आणि मराठ्यांच्यात घमासान युद्ध झाले. अखेर सायंकाळी सहा वाजता तोफांचे आवाज आले. याचवेळी बाजींच्या वर्मी घाव बसला आणि ते कोसळले. बाजीप्रभू व इतर मराठा सैनिकांच्या बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. आजही या खिंडीत पोहोचताच १३ जुलै १६६० च्या रणसंग्रामाची आठवण होते. स्वामीनिष्ठेपायी, स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा या इतिहासात अजरामर झालेल्या या ठिकाणी जाताना छाती अभिमानाने फुलून येते.
 
काय पहाल
पावनखिंडीजवळ मोठे स्मारक उभे आहे. मुख्य रस्त्यावरून खाली पन्नास एक पायऱ्या उतरून गेलं की एका छोट्याशा ओढ्यावर असलेला पूल ओलांडावा लागतो. पायऱ्या उतरताना खाली नजरेसमोर पसरलेली दाट झाडी. पण तो छोटासा पूल ओलांडला की अचानक उजवीकडे ढाल-तलवार अन् भगवा झेंडा असं स्मारक सामोरं येतं. इथून पुढे सुरू होते पावनखिंड. इथे जवळच कासारी नदीचं उगमस्थान आहे. ओढ्याच्या रूपानं ती पुढे वाहत जाते. 
 
सध्या खिंडीत उतरण्यासाठी लोखंडाच्या दोन शिड्या बनवल्या आहेत. २५-३० फूट खाली उतरताना आपली चांगलीच तारांबळ उडते. खिंडीमध्ये जागोजागी मोठमोठे खडक, शिळा पडलेल्या आढळतात. पुढे जाऊ तसं खिंडीची रुंदी आणि खोली वाढत जाते, पण तरीही जास्तीत जास्त रुंदी सुमारे पंधरा फुटापर्यंत असावी. खिंडीत जमीन अशी दिसतच नाही. सगळीकडे शिळांचा खच पडलेला. दीड-दोनशे मीटरनंतर खिंड काटकोनात वळून डावीकडे जाते. शेवटपर्यंत लांबी सुमारे पाचशे मीटरपर्यंत असावी. असं सांगतात की खिंड पूर्वी एवढी रुंद नव्हती. काळाच्या ओघात पाण्याच्या प्रवाहामुळे शिळा कोसळून ती अधिक रुंदावली आहे. आजही पावनखिंड जंगलांनी अशी आच्छादली आहे की भर दुपारीसुद्धा सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत.
 
कसे जाल 
कोल्हापूरहून मलकापूर मांजरे रोड, येळवण मार्गे तसेच पुण्याहून कराड, मलकापूर मांजरे रोड, येळवण मार्ग पावनखिंडीस जाता येते.
विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी पावनखिंड आहे.