गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By वेबदुनिया|

जिवंतपणीच पितरांचे श्राद्ध!!!!

माझा एक मित्र मला मिठाईच्या दुकानात भेटला, त्याने सांगितले की त्याच्या आईचे आज श्राद्ध आहे आणि तिला लाडू फार आवडतात म्हणून तो लाडू घ्यायला आला आहे. मी फार मोठ्या संकटात पडलो, कारण 5 मिनिट अगोदरच त्याची आई मला भाजी घेताना दिसली होती. मी काही बोलणार त्या आधीच त्याची आई भाजीची पिशवी घेऊन येताना दिसली. मी मित्राच्या पाठीवर एक दणकाच दिला आणि म्हटले हा काय प्रकार आहे? आईतर तुझ्या जवळच आहे! मित्र आईच्या खांद्यावर हात ठेवून हसून म्हणाला, आई मेल्यानंतर गाय-कावळ्याच्या ताटात लाडू ठेवण्यापेक्षा चांगले आहे की आईच्या थाळीत लाडू वाढून जिवंतपणीच तिला तृप्त करू. मला उमजले आहे की जिवंतपणीच आई-वडिलांना प्रत्येक परिस्थितीत सुखात ठेवणे हेच खरे श्राद्ध आहे.
 
त्याने पुढे सांगितले की आईला मधुमेह आहे. पण तिचे आवडते पदार्थ म्हणजे फळं आणि पक्वान्न आहेत. मी हे सर्व तिला योग्य प्रमाणात खाऊ घालतो. तसं बघितलं तर, श्रद्धाळू मंदिरात जाऊन उदबत्ती लावतात पण मी मंदिरात न जाता आईच्या खोलीत झोपताना कासवछाप अगरबत्ती लावतो. सकाळी आई जेव्हा गीतेचा पाठ वाचयला बसते तेव्हा मी तिचा चश्मा पुसून देतो, मला असे वाटते की देवांचे फोटो, मूर्ती इत्यादी साफ करण्यापेक्षा आईचा चश्मा साफ केल्याने जास्त पुण्य प्राप्त होऊ शकते. 
 
माझ्या मित्राने बोललेले शब्द बऱ्याच लोकांना कडू वाटतील, पण हे खरे आहे. आम्ही लोकं मरणोपरांत त्यांचे श्राद्ध करतो, समाजातील लोकांना खीर-पुरीचा प्रसाद म्हणून देतो, कर्तव्याआड आम्ही हे सर्व करून तर घेतो पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे गाय-कावळ्यांना घातलेला घास कधीच त्यांच्यापर्यंत जात नाही. संपूर्ण जगात आजपर्यंत स्वर्गीय लोकांसाठी कुठल्याही प्रकारची टिफिनसेवा आजतायगत सुरू झालेली नाही. आई-वडिलांना जिवंतपणीच सर्व सुख देणे हेच खरे श्राद्ध आहे. 
 
एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपण कितीही समजूतदार आणि त्यांचे कितीही प्रिय असलो तरी म्हातारपणात होणारा त्रास, लाचारी आणि असहायता समजू शकत नाही. जसे जोपर्यंत डोळ्यांची वात विझत नाही तो पर्यंत अंधाराची लाचारी समजू शकत नाही. अशा परिस्थितीत वृद्धांना पेश्यापेक्षा प्रेमाची आणि सल्ल्यापेक्षा सहाऱ्याची जास्त गरज भासते.
 
आजच्या व्यस्त आणि तणावयुक्त जीवनात मुलांच्या खाद्यांवर बऱ्याच जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांची इच्छा असली तरी ते आपल्या आई-वडिलांची काळजी पूर्णपणे घेऊ शकत नाही, अशा मुलांना आपण थोडेफारतरी माफ करू शकतो पण लग्नानंतर आपल्या बायको मुलांची जबाबदारी फार चांगल्याप्रकारे निभवत असताना आपल्या आई-वडिलांकडे जे व्यक्ती दुर्लक्ष करतात, जे व्यक्ती आई-वडिलांना जिवंतपणी पावभर भजीसुद्धा खाऊ घालत नाही पण त्यांच्या मृत्यूनंतर हजारो रुपये खर्च करून ब्राम्हण भोज करतात, ज्यांना जिवंतपणी भातावर 1 चमचा तूप देखील घालत नाही पण त्यांच्या मृत्यूनंतर स्मशानात चितेवर किलोने तूप वाहतात व ब्राह्मणांना दान देतात अशा मुलांना कसली माफी? तिर्थस्थळांवर जाऊन त्यांचे श्राद्ध करणे हा देखील एक लाभरहित प्रकार आहे. जुन्या काळातील लोकांचे विचार बदलणे शक्य नसले तरी नवीन पिढीला अश्या खोखल्या रितींवर विचार करणे आवश्यक आहे. पुण्यतिथीच्या दिवशी त्यांची आठवण करून श्राद्धावर होणारा खर्च कुठल्याही समाजकार्यात खर्च केला तर ही त्यांना दिलेली सर्वश्रेष्ठ श्रद्धांजली राहील.
 
एक प्रसिद्ध शायर देवदास 'अमीर'चे एक पुस्तक वाचले त्यात रमेश जोशींच्या एका पंक्तीकडे सहजच लक्ष गेलं - 'जेव्हा मी लहान होतो आणि डोळ्यात अश्रू येत असतात तेव्हा आई आठवते, आज जेव्हा आईची आठवण येते तेव्हा डोळ्यात सहजच अश्रुधारा येतात.' संत म्हणतात की बालपणी जेव्हा तुम्ही चालू शकत नव्हते तेव्हा तुमच्या आई-वडिलांनी हात धरून चालाव्यास शिकविले आणि आता जेव्हा ते चालू शकत नाहीत तेव्हा तुम्ही त्यांचा हात धरून त्यांना सहारा द्यावा. 
 
जर तुम्ही वृद्धावस्थेत आई-वडिलांना तीर्थस्थानांवर नाही नेले तरी चालेल पण त्यांचा हात धरून त्यांना आदराने स्नानगृहापर्यंत नेले तर तुम्हाला संपूर्ण तीर्थांचे पुण्य लाभेल. असे म्हणतात की आई-वडील जीवनात फक्त दोनवेळा रडतात - एकदा जेव्हा मुलगी आपल्या सासरी जाते आणि दुसऱ्यांदा जेव्हा मुलगा घर सोडून दूर जातो. पण आईला तर जन्मभर रडावेच लागते कारण मुलं लहान असताना जेव्हा जेवत नाही तेव्हासुद्धा तिच्या डोळ्यात पाणी येते आणि जेव्हा मुलं मोठे होतात आणि तिला अन्नाच्या एका घासासाठी देखील विचारत नाहीत तेव्हादेखील तिला रडावेच लागते. 
 
कशी विडंबना आहे की ज्या मुलांना आई बोलणे शिकवते तिच मुलं मोठी झाल्यावर तिला गप्प बसायला सांगतात. मातृप्रेमाबद्दल लोककवींनी बरेच काही लिहिले आहे. नरक काय आहे, हे आपणास माहीत नाही पण नरकयातनांपासून बचावासाठी आम्ही देवाजवळ जशी रोज प्रार्थना करतो तशीच म्हाताऱ्यापणाची पीडा भलेही आज आम्हाला समजत नसेल परंतु त्या दु:खाची कल्पना करून आम्ही वृद्धांची प्रेमाने सेवा केली पाहिजे. 
 
रस्त्यात जेव्हा आम्हाला एखादी शवयात्रा दिसली की आमचे हात लगेचच त्या व्यक्तीसाठी जोडले जातात, ज्या व्यक्तीला आम्ही ओळखत देखील नाही, परंतु मृत्यूनंतर आम्ही त्याला आदर देतो. याचा अर्थ हा की जगातील सर्वच व्यक्ती सन्मानाच्या लायक असो किंवा नसो परंतु त्या व्यक्तीस आम्ही आदराने हात जोडतो. तसे बघितले तर म्हातारपण हे जीवनातील सगळ्यात शेवटचे स्टेशन आहे आणि तेथून जीवनातील सर्व कर्मांचे हिशोब करत व्यक्ती अनंताच्या यात्रेवर निघून जातो जेथून ती परत येत नाही. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांच्या वृद्धावस्थेत त्यांची नीट नेटकी देखभाल केली पाहिजे जेणे करून त्यांनी आपणासाठी उचललेल्या कष्टांची आपण परतफेड करून त्यांचे जीवन आनंदमयी व सफल करण्यास हातभार लावून त्यांची अनंतयात्रा मंगलमय करू शकतो. 
 
आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्याला जीवनाच्या शर्यतीत सर्वात पुढे पाहण्याची इच्छा बाळगून आहे आणि ही गोष्ट आई-वडिलांना देखील मान्य आहे. पण म्हातारपणी त्यांची फक्त एवढीच इच्छा असते की या आपाधापीत त्याने थोडा वेळ का होईना आपल्या जवळ बसून दोन शब्द प्रेमाचे बोलले पाहिजे बस! 
 
एका आईने परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलाला सांगितले की तुझ्या एका तासाच्या कमाईचे पैसे मी तुला देते पण तू हा एक तास ऑफिससाठी न देता माझ्याशी बोलण्यात घालव. कारण की तू माझ्यापासून इतका दूर आहेस की मी तुला आज पाहू तर शकते पण तुझ्या पाठीवर हात फिरवू शकत नाही!!!! परंतु आपणात होणारा रोजचा संवाद मला माझे जीवन सुखाने व आनंदाने घालवण्यास मदत करेल.
 
या संपूर्ण गोष्टींचा सार असा आहे की आपणास जीवन देणाऱ्या आपल्या पितरांना त्यांच्या जिवंतपणी जेवढे सुख देऊ शकतो ते नक्कीच द्यावे आणि त्यांचा आनंद हीच आपल्या जीवनाची कमाई आहे. 
 
अनुवादक - स्मिता जोशी