बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (12:52 IST)

यूएस ओपन : स्पर्धेत व्हीनसने सेमीफायनलमध्ये धडक मारून इतिहास घडवला

नववी मानांकित व्हीनस विल्यम्स आणि बिगरमानांकित स्लोन स्टीफन्स या अमेरिकेच्याच खेळाडूंमध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची पहिली उपान्त्य लढत रंगणार आहे. माजी विम्बल्डन विजेत्या मारिया शारापोव्हावर सनसनाटी मात करणाऱ्या लात्वियाच्या सोळाव्या मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाचे आणि 13व्या मानांकित पेट्रा क्‍विटोव्हाचे आव्हान महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
 
चौथ्या फेरीत जर्मनीच्या तिसाव्या मानांकित ज्युलिया जॉर्जेसवर खळबळजनक मात करणाऱ्या स्लोन स्टीफन्सने उपान्त्यपूर्व लढतीत लात्वियाच्या सोळाव्या मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाचे आव्हान 6-3, 3-6, 7-6 (7-4) असे मोडून काढताना पहिल्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली.
 
तर दुसऱ्या उपान्त्यपूर्व सामन्यात नवव्या मानांकित व्हीनस विल्यम्सने झेक प्रजासत्ताकाच्या 13व्या मानांकित पेट्रा क्‍विटोव्हाचा कडवा प्रतिकार 6-3, 3-6, 7-6 (7-2) असा संपुष्टात आणताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. पेट्रा क्‍विटोव्हाने स्पेनच्या तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझाचा सनसनाटी पराभव केला होता. मात्र व्हीनसच्या जिद्दीसमोर तिची मात्रा चालली नाही.
 
पुरुष एकेरीत स्पेनचा अग्रमानांकित राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा तृतीय मानांकित रॉजर फेडरर या अव्वल खेळाडूंनी सरळ सेटमध्ये विजयाची नोंद करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली. नदालने युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोगोपोलोव्हचा 6-2, 6-4, 6-1 असा सहज पराभव केला. तर फेडररने जर्मनीच्या 33व्या मानांकित फिलिप कोहेलश्रिबरला 6-4, 6-2, 7-5 असे नमविले.
 
ल्यूसी रॅडेका आणि कॅटरिना सिनियाकोव्हा या झेक प्रजासत्ताकाच्या सातव्या मानांकित जोडीने स्लोव्हाकियाची आन्द्रेजा क्‍लेपॅक व स्पेनची मारिया जोस सॅंचेझ या चौदाव्या मानांकित जोडीवर 7-6, 6-3 अशी मात करताना महिला दुहेरीची उपान्त्य फेरी गाठली. त्यांच्यासमोर आता भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा व चीनची शुआई पेंग ही चतुर्थ मानांकित जोडी विरुद्ध हंगेरीची तिमिया बाबोस व झेक प्रजासत्ताकाची अँड्रिया लाव्हाकोव्हा या पाचव्या मानांकित जोडीतील विजयी जोडीचे आव्हान आहे.
 
रोहन बोपण्णा व कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोव्हस्की या सातव्या मानांकित जोडीवर मात करताना मिश्र दुहेरीची तिसरी फेरी गाठली होती. मात्र त्यांना तैपेईची हाओ चिंग चॅन व न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस या तृतीय मानांकित जोडीकडून 4-6, 6-3, 10-6 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा लिअँडर पेस आणि पूरव राजा या भारतीय जोडीचे आव्हान पुरुष दुहेरीच्या दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले आहे. तसेच सानिया मिर्झा आणि इव्हान डॉडिग या जोडीलाही मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. आणि रोहन बोपण्णा व उरुग्वेचा पाब्लो क्‍यूव्हॅस या दहाव्या मानांकित जोडीलाही फॅबिओ फॉगनिनी व सिमोन बोलेल्ली या जोडीकडून हार पत्करावी लागली.