शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: रविवार, 30 जुलै 2023 (17:26 IST)

लव्ह बॉम्बिंग : नोकरीच्या शोधात असलेल्यांना 'असं' अडकवलं जातं जाळ्यात

ते दिवसातून तुम्हाला बऱ्याच वेळा टेक्स्ट मॅसेज करतात, ईमेल आणि फोन कॉलच्या माध्यमातून संपर्क करतात. तुमची खुशामत करतात आणि असं दाखवून देतात की, तुमच्या पेक्षा दुसरं कोणी चांगलं असूच शकत नाही.
 
मग तुम्ही त्यांना भेटून भले काहीच दिवस झाले असतील. पण तुमच्या स्तुतीत ते कित्येक तास घालवतात, तुम्हाला आश्वासनं देतात.
 
अशा प्रकारच्या वागण्याला 'लव्ह बॉम्बिंग' म्हणतात.
 
लव्ह बॉम्बिंग आणि नोकरी
बऱ्याचदा डेटिंगच्या संदर्भात असे शब्द वापरले जातात. एखाद्याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला जातो, त्याच्यासाठी काहीतरी विशेष केलं जातं.
 
पण केवळ प्रेमापुरता हा शब्द मर्यादित नाहीये. कामाच्या ठिकाणी देखील अशा पद्धतीच्या वागणुकीला सामोरं जावं लागतं. अनेक कंपन्या रिक्त पदं भरण्यासाठी उमेदवारांशी अशा प्रकारे वागतात. त्यांना पदाची कर्तव्य आणि जबाबदारीची माहिती देण्याऐवजी त्यांच्या अनुभवाची स्तुती करण्यावर, त्यांना आश्वासनं देऊन आकर्षित करण्यावर अधिक भर दिला जातो.
 
बंगळुरूमधील एका बिझनेस सोल्युशन्स कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करणारे रोहित पराशर सांगतात की, त्यांच्या मागच्या नोकरीत त्यांच्या सोबत हेच घडलं. ते वडोदरा येथील एका कंपनीत कामाला होते. पगारात वाढ नसल्यामुळे ते इतर ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करत होते.
 
त्यांनी गुरुग्राममधील एका कंपनीसाठी मुलाखत दिली आणि त्यांची निवड झाली.
 
दरम्यान रोहितच्या आधीच्या कंपनीतही पगार वाढला होता. पण गुरुग्राम येथील कंपनीच्या एचआर विभागाने त्यांना सातत्याने फोन करून ऑफर स्वीकारण्यासाठी मनवलं.
 
रोहित सांगतात, "कंपनीतून मला वारंवार सांगण्यात आलं की, मला केवळ चांगला पगारच नाही तर इतरही अनेक सुविधा मिळतील. कंपनीतलं वातावरण चांगलं आहे आम्ही कर्मचार्‍यांची काळजी घेतो. तुम्हाला तुमच्या प्रोफाईलनुसार काम देतो. तुमच्या कामानुसार इथे पगारवाढ दिली जाते."
 
खूप विनवण्या केल्यानंतर रोहितने ही ऑफर स्वीकारली आणि वडोदरा सोडून आणि गुरुग्रामला गेले.
 
अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथील करिअर प्रशिक्षक समॉरन सेलिम सांगतात की, जेव्हा रिक्त पदांसाठी योग्य उमेदवार मिळत नसतो तेव्हा अशा प्रकारचं वर्तन दिसून येतं.
 
समॉरन सांगतात, "अशा परिस्थितीत उमेदवाराची स्थिती मजबूत असते. पण अशा योग्य उमेदवाराला घेण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असते. अशा परिस्थितीत रिक्रूटमेंट करणारे कंपनीला जास्तीत जास्त पर्याय देण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा उमेदवार कमी असतात तेव्हा त्यांना आकर्षित करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो."
 
'कंपन्या फक्त चांगली बाजू दाखवतात'
बऱ्याचदा आपली प्रतिमा चांगली आणि मजबूत दाखवावी यासाठी कंपनी त्यांच्या एचआर विभागावर दबाव आणत असते.
 
करिअर प्रशिक्षक समॉरन सेलिम सांगतात की, हे अगदी प्रेमसंबंधातील सुरुवातीच्या क्षणांसारखं असतं. रिक्रूटमेंट करणारे लोक उमेदवारांना त्यांच्या त्रुटी किंवा कमकुवतपणाऐवजी त्यांची सर्वोत्तम बाजू दाखवू इच्छितात.
 
ग्लोबल रिक्रूटमेंट कंपनी असलेल्या सिएलोच्या व्यवस्थापकीय संचालक सॅली हंटर यांच्या मते, बऱ्याच रिक्रूटर्सना माहीत नसतं की ते लव्ह बॉम्बिंग सारखं वागत आहेत.
 
त्या सांगतात की, "नियुक्ती करणारे देखील आशावादी असतात आणि त्यांना विकायचं कसं हे चांगलं माहीत असतं. त्यांच्या चांगल्या भावनांमुळे त्यांचं वागणं चांगलं असतं. त्यांना वाटतं की उमेदवाराला नोकरी मिळावी आणि त्याने त्यात खूश राहावं."
 
पण सॅली म्हणतात की, पण लव्ह बॉम्बिंगसारख्या या प्रकरणामध्ये इतरही कारणं असू शकतात. जेव्हा कंपनीतील रिक्त पदांसाठी एखाद्या तिसऱ्या रिक्रुटरकडून भरती केली जाते तेव्हा त्यांच्या फायद्यासाठी उमेदवारांना बऱ्याच गोष्टी वाढवून चढवून सांगितल्या जातात.
 
त्या सांगतात, "जर भरती करणार्‍यांना कमी पगार असेल आणि त्यांना भरती करताना जादाचं कमिशन मिळत असेल तर ते कोणत्याही रिक्त जागा भरण्यासाठी शक्य तितक्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी ते उमेदवारांना लव्ह बॉम्बिंग सारखी वागणूक देतील."
 
नुकसानकारक स्तुतीसुमनं उधळतात'
 
हे सगळं कोणत्याही वाईट हेतूमुळे करतात असं नाही पण कंपन्यांचा हेतू काहीही असू शकतो. बऱ्याचदा कर्मचाऱ्यांनाही याचा तोटा सहन करावा लागतो. उमेदवार दबावाखाली येऊन त्याच्यासाठी योग्य नसलेली नोकरी स्वीकारू शकतो.
 
रोहित पराशरच्या बाबतीतही तेच झालं. चांगल्या भविष्याच्या आशेने ते गुरुग्रामला गेले. नवीन कंपनी जॉईन केली, पण तिथली परिस्थिती वेगळीच होती.
 
ते सांगतात की, "एखादी चूक झाली तर वरिष्ठांनी ओरडणं स्वाभाविक आहे. कॉर्पोरेट जगतात प्रत्येकाला त्याच्या नावाने हाक मारली जाते. पण मी आमच्या व्यवस्थापकाला सर असं म्हटलं नाही म्हणून त्यांना राग आला. जेव्हा जेव्हा टीम मध्ये काही अडचण यायची तेव्हा तेव्हा व्यवस्थापक त्यांना वेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्याऐवजी सगळ्यांसमोर ओरडायचे."
 
नोकरीची ऑफर देताना जी आश्वासनं दिली होती त्यापेक्षा हे वातावरण वेगळ होतं.
 
रोहित सांगतात की, या वातावरणाशी त्यांना जुळवून घेता आलं नाही आणि त्यांनी चौथ्या महिन्यातच राजीनामा टाकला
 
असाच प्रकार घडला होता अमेरिकेतील 46 वर्षीय कियर्स्टन ग्रेग्स सोबत. त्या स्वतः एक रिक्रूटर आहेत. कंपन्यांसाठी उमेदवार मिळवून देण्याचं काम त्या करतात. वॉशिंग्टन डीसीमधील एका कंपनीत नोकरीसाठी त्यांना बरीच आश्वासनं देण्यात आली होती.
 
ग्रेग्स म्हणतात, "मला असं म्हटले की, तुमचं या क्षेत्रात खूप नाव आहे. मला थेट नोकरीची ऑफर देण्यात आली. तुम्ही घरून काम करू शकता आणि तुम्हाला अधिक सुविधा मिळतील, असं सांगण्यात आलं."
 
मात्र भरती प्रक्रिया संपताच परिस्थिती बदलली.
 
पहिल्याच दिवशी व्यवस्थापनाने ग्रेग्स यांना ऑफिसला यायला सांगितलं. त्या ऑफिसला गेल्यावर तिथे कोणीही त्यांच्याशी बोललं नाही. कोणत्याच टीमने त्यांची ओळख करून दिली नाही. त्यांनी व्यवस्थापकाशी संपर्क साधला तेव्हा घरून काम करता येत नाही असं त्यांनी सांगितलं. ही कंपनीची पॉलिसी नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं.
 
तिथली कामाची पद्धत पाहून ग्रेग्सलाही आश्चर्य वाटले. ऑफिस मध्ये असभ्य शब्द वापरले जायचे. त्यांनी पाहिलं की तिथे नोकरीसाठी आलेल्या अपंग उमेदवाराला योग्य वागणूक दिली जात नव्हती. आठ दिवसांनी त्यांनी नोकरी सोडली.
 
मनोबलावर परिणाम
करिअर प्रशिक्षक सेलिम म्हणतात की यात आणखी एक समस्या आहे. काही उमेदवारांना ऑफर मिळाल्यावर ते खूप उत्साहित होतात, पण नंतर त्यांना नोकरीच दिली जात नाही.
 
त्या सांगतात, असं घडतं कारण काही रिक्रूटर्स अनेक उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना गोंधळात टाकतात जेणेकरून कंपन्यांना अधिकाधिक पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे जर त्यांनी एखाद्याला सांगितलं की तुम्ही भरती प्रक्रियेत इतर उमेदवारांपेक्षा पुढे आहात, तर तुम्हाला नोकरी मिळाली आहे असं होत नाही.
 
करिअर समुपदेशक परवीन मल्होत्रा यामागे आणखीन एक कारण असल्याचं सांगतात.
 
त्या सांगतात, "हे असं घडतं कारण नोकऱ्या कमी आणि उमेदवार जास्त असतात. पण बऱ्याचदा असंही बघायला मिळतं की, कोणाला कोणतं पद द्यायचं हे कंपनीने आधीच ठरवून टाकलेलं असतं. पण कारभार पारदर्शक आहे हे दाखवण्यासाठी ते जाहिराती आणि बनावट भरती प्रक्रिया सुरू करतात."
 
पण यामुळे एखाद्या उमेदवाराचं मनोधैर्यच खचतच नाही तर त्याचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं. एखाद्या कंपनीने केलेल्या लव्ह बॉम्बिंगमुळे त्याने दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीची नोकरीची ऑफर नाकारली असण्याची शक्यता असते.

अशा प्रकारातून कसं वाचाल?
एखादा रिक्रूटर उमेदवाराशी कसं वागेल हे सांगणं कठीण आहे, त्यांचं वागणं बदलणं कठीण आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की इथे लव्ह बॉम्बिंग सारखा प्रकार दिसतोय तर मात्र काळजी घ्यायला हवी.
 
सॅन फ्रान्सिस्कोमधील करिअर प्रशिक्षक समॉरन सेलिम सांगतात, "उमेदवारांनी काही संकेत पडताळले पाहिजेत. नियुक्ती करताना उमेदवाराच्या अनुभवाची आणि कौशल्याची प्रशंसा करणं स्वाभाविक आहे. आणि तसं पण नोकरी देताना समोरच्या व्यक्तीला महत्त्व देणं गरजेचं असतं. पण समोरचा व्यक्ती अतिशयोक्ती पूर्ण बोलत असेल किंवा पारदर्शकता ठेवत नसेल तर मात्र काळजी घेण्याची गरज आहे."
 
करिअर समुपदेशक परवीन मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार, "खरेदीदाराने खरेदी करताना सावध असायला हवं असं म्हटलं जातं. नोकरी शोधताना ही हेच तत्व लागू होतं."
 
त्या म्हणतात, "बऱ्याचदा घडतं असं की, कंपनी कर्मचाऱ्यांना जे आश्वासन देते त्याच्या अर्धही त्यांना मिळत नाही. अशा परिस्थितीत कंपनीविषयी माहिती गोळा करण्याचं काम उमेदवारांचं असतं. पूर्वी अशी माहिती मिळवणं कठीण होतं. पण आता बरेच कर्मचारी कंपनीबद्दल ऑनलाइन रिव्यू टाकतात. त्यातून तुम्हाला कंपनीविषयी माहिती मिळू शकते. कंपनीत कसं वातावरण आहे, त्यांची धोरणं काय आहेत या सगळ्याविषयी ऑनलाइन माहिती मिळते."
 
थोडक्यात लव्ह बॉम्बिंग पासून वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे - सावधगिरी बाळगणे.
 
Published By- Priya Dixit