शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (14:44 IST)

व्हॉट्सअॅप: हॅकिंग होऊ नये म्हणून व्हॉट्सअॅप डिलीट करणं, हा सुरक्षित उपाय आहे का?

'तुमचे व्हॉट्सअॅप चॅट कुणीतरी वाचतंय!' हे शब्द तुमच्या कानावर गेल्या आठवड्याभरात पडले असतीलच. कारण एका छुप्या सॉफ्टवेअरचा वापर करून काही लोक तुमच्या फोनमध्ये डोकावू पाहतायत, अशी कबुली व्हॉट्सअॅपनं दिली आहे.
 
स्पायवेअरच्या माध्यमातून काही युजर्सच्या फोनमध्ये 'घुसखोरी' झाल्याच्या वृत्ताला व्हॉट्सअॅपनं दुजोरा दिल्यानंतर भारतासह अनेक देशात राग आणि चिंता व्यक्त होत आहे.
 
अनेक देशांत तिथल्या सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, हे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या इस्रायलच्या NSO ग्रुपनुसार त्यांनी पेगासिस हे सॉफ्टवेअर आपण सरकारांनाच विकत असल्याचं सांगितलंय.
 
या आरोपांमुळेच व्हॉट्सअॅपने NSO कंपनीवर आरोप केले आहेत. मात्र या कंपनीने हे आरोप साफ फेटाळले आहेत, तसंच भारत सरकारनंही या प्रकरणात आपला हात असल्याचं नाकारलं आहे.
 
हे 'स्पायवेअर' इन्स्टॉल झाल्याची बातमी कळल्यानंतर अनेक जण हे लोकप्रिय अॅप आपल्या फोनमधून काढून टाकण्याचा विचार करत आहेत. तुमच्याही मनाला हा विचार शिवून गेला असेल, न्हाई?
 
पण तज्ज्ञांच्या मते हा यावरचा उपाय नाही.
 
व्हॉट्सअॅपला पर्याय काय?
काही युजर्स व्हॉट्सअॅपला पर्याय शोधत आहेत. सिग्नल किंवा टेलेग्रॅमसारखे मॅसेजिंग अॅप्स अधिक सुरक्षित आणि 'एनक्रिप्टेड' असल्याची चर्चा असल्यामुळे त्यांचा विचार केला जात आहे.
 
180 देशांमध्ये तब्बल 1.5 अब्ज लोक व्हॉट्सअॅप वापरतात. भारतात या अॅपचे 40 कोटी युजर्स आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं युजर्स असल्यामुळं हॅकिंग होणं शक्य आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅपला दोषी धरणं फारसं योग्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
व्हॉट्सअॅपमधलं व्हिडिओ कॉलिंग फीचरमध्ये काही सुरक्षेच्या त्रुटी असल्यानं त्याच्या माध्यमातून या स्पायवेअरने युजरच्या फोनमध्ये नकळत प्रवेश केला. मात्र यापुढे फोनच्या ऑपरेटिंग सिस्टिममधल्या त्रुटींमुळे या सॉफ्टवेअरला फोनचा पूर्ण ताबा घेता येतो.
 
"फोन अँड्रॉइड असो वा अॅपल, स्पायवेअरने ऑपरेटिंग सिस्टिममधील त्रुटींचा फायदा घेतला," असं तंत्रज्ञानातील खासगीपणा या विषयातील तज्ज्ञ वकील विनय केसरींनी सांगितलं.
 
"तुमच्या हँडसेटमध्ये स्पायवेअर असेल तर तुमच्या फोनमधली प्रत्येक वाचता येणारी फाईल, संदेश, कॅमेरा किंवा माईकद्वारे आलेली गोष्ट यांना धोका आहे," असं तंत्रज्ञान विषयक लिखाण करणारे प्रशांतो के रॉय यांनी म्हटलं.
 
प्रत्येक मेसेज एन्क्रिप्टेड असल्यानं व्हॉट्सअॅप हे सर्वात सुरक्षित कम्युनिकेशन अॅप असल्याचा प्रचार व्हॉट्सअॅपकडून केला जातो. याचाच अर्थ मेसेज पाठवणारी आणि मेसेज पाठवलेली व्यक्ती या दोघांनाच त्यांच्या मोबाइलवर वाचता येईल, अशा स्वरूपात हे मेसेज मिळतात.
 
"पण एकदा तुमच्या हँडसेटमध्ये स्पायवेअर आलं की तुमचा मेसेज एन्क्रिप्टेड आहे किंवा नाही यानं काहीही फरक पडत नाही. तुमच्या फोनमध्ये जे काही आहे ते सर्वकाही हॅकर पाहू शकतो. कारण ते सर्वकाही डिक्रिप्टेड आणि वाचण्यायोग्य केलेलं असतं," असंही प्रशांतो के रॉय यांनी सांगितलं.
 
त्यांनी पुढं म्हटलं, "हे म्हणजे तुम्ही फोनचं लॉक काढून तो एखाद्याच्या हातात दिल्यासारखंच आहे. यावरून ऑपरेटिंग यंत्रणा किती असुरक्षित आहेत हे लक्षात येतं."
 
इतर पर्याय किती सुरक्षित?
बहुतांश युजर्स हे सिग्नलसारख्या ओपन सोर्स कोडसाठी ओळखल्या जाणाऱ्या इतर मेसेजिंग अॅपकडे वळत आहेत. पण असं अॅप बदलल्यानं खरंच तुमचा फोन स्पायवेअरपासून सुरक्षित राहतो का?
 
"अजिबात नाही," केसरी सांगतात.
 
"सिग्नलसारख्या अॅपमध्ये पारदर्शकतेसाठी कोड सार्वजनिक करण्याची पद्धत आहे. तुम्ही एक चांगले कोडर आहात आणि कंपनीनं तुम्हाला एक ठराविक बग तयार करून दिलं असेल तर तुम्ही तुमचा कोड वापरू शकता आणि केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवू शकता," असं केसरी यांनी सांगितलं.
 
"ही पारदर्शकता म्हणजे सुरक्षितता नव्हे," अशी धोक्याची सूचनाही केसरी देतात.
 
ही घुसखोरी किंवा सायबर हल्ला केवळ अॅपपुरता मर्यादित नसल्याचं प्रशांतो के रॉय यांनी बीबीसीला सांगितलं.
 
"ज्यांच्या हँडसेटशी छेडछाड करण्यात आली होती, त्यांची फक्त व्हॉट्सअॅपवरीलच नाही तर सर्व माहिती धोक्यात आहे,'' असं रॉय यांनी सांगितलं.
 
यामुळेच सध्याच्या परिस्थितीत इतर कोणत्याही अॅपपेक्षा व्हॉट्सअॅप 'कमी सुरक्षित आहे' असं मानण्याचं काही कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.