1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...

मी माझ्या अटींवर काम करते- आशा भोसले

PRPR
आशा भोसले यांच्या 'आशा अँड फ्रेंड्स' या अल्बममध्ये ब्रेट ली, उर्मिला मातोंडकर आणि संजय दत्त त्यांच्याबरोबर गायले होते. आज वयाची ७५ उलटली तरी आशाबाईंच्या मैत्रीचे वर्तुळ विस्तारतेच आहे. काम करणे अजूनही सुरूच आहे, सहाजिकच नवे मित्र जोडणेही सुरूच आहे. या तरूणाईबरोबरच 'चिरतरूण' आशाताईही सहज मिसळून जात आहेत. त्यांचा 'फ्रेंड्स' या साखळीतील नवा अल्बम येत आहे. यासंदर्भात 'ट्रान्स वर्ल्ड फिचर'च्या बॉलिवूड प्रतिनिधीने घेतलेली त्यांची मुलाखत.....

तुम्हाला याही वयात एवढी उर्जा कुठून मिळते?
(हसत हसत) कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत मला असेच जगावेसे वाटत असावे. खरे तर या उर्जेचा स्त्रोत ह्रदय तरूण असण्याशी आहे. मी आयुष्य मस्तपैकी एंजॉय करते आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मला असेच जगावेसे वाटते.

तुम्ही गाण्याविषयी म्हणताय?
अर्थात. दुसरे काय? मी केवळ संगीतासाठीच जन्माला आलीय. त्यामुळे मी संगीतासाठीच जगणार आणि त्याबरोबरच शेवटचा श्वास घेईन.

म्हणूनच तुम्ही 'आशा अँड फ्रेंड्स' केलात काय?
होय. तो अतिशय छान अनुभव होता. विशेषतः ब्रेट ली समवेत. तसेच संजय दत्त समवेतही. ही सगळी अतिशय छान मंडळी आहेत आणि ते सगळे माझ्यावर निरातिशय प्रेम करतात. खरे तर मी आता 'आशा अँड फ्रेंडस'च्या तिसर्‍या भागासाठीही तयार आहे.

वा!! भन्नाट. ऐकायला छान वाटतेय...
होय. फक्त काही दिवसांची प्रतीक्षा आहे. मिथून चक्रवर्ती आणि अनिल कपूरने त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग केले आहे.

तेही अतिशय उत्साही असतील....
त्यांनी अतिशय छान गायलंय. दोघेही चांगले गायक आहेत.

तुम्ही या अल्बममध्ये गाणार्‍यांना निवडता कसे?... की ते स्वतःच तुम्हाला येऊन भेटतात?
हं. मला माहिती असतं. कोण चांगले गाऊ शकते. त्याची माहिती जमवून ठेवावीच लागते. आजपर्यंत कुणीही येऊन मला गायचंय असं म्हणून गेलेलं नाही. तशी कुणाची हिंमतच झालेली नाही. (हसतात) ते माझा अतिशय आदर करतात. मग मी त्यांच्यातला योग्य गायक निवडते आणि त्याच्या आवाजात रेकॉर्डिंग करून घेते.

  माझी कामाची पद्धत वेगळी आहे. तशीच लतादिदीचीही आहे. म्हणूनच आम्ही इंडस्ट्रित स्वतःचे स्थान निर्माण करू शकलो आहोत. मी लाईव्ह शो करते, तेव्हा माझ्या काही अटी असतात. स्टेजवर मला कोणताही गोंधळ नको असतो.      
हा अल्बम आता आम्हाला केव्हा ऐकायला मिळेल?
खरे तर अजून बरेच काम बाकी आहे. माझं स्वतःचं रेकॉर्डिंग बाकी आहे. शिवाय 'पोस्ट प्रॉडक्शन' कामही राहिलं आहे. त्यामुळे हा अल्बम नक्की केव्हा येणार हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे मात्र नक्की.

मग तुमच्या मते चांगला गायक कोण आहे? मिथून चक्रवर्ती की अनिल कपूर...
निश्चितच दोघेही. खरे तर मी त्यांच्याबरोबर गायलेली नाही. बोमन इराणी यांचाही आवाज छान आहे. अनिल कपूरचा आवाज छान आहे, हे मला बर्‍याच आधीपासून माहिती आहे. मी त्याला एक-दोनदा गाताना ऐकलेय. मिथूनमध्येही भरपूर उर्जा आहे. गाणार का असे विचारल्यानंतर त्याचा उत्साह पाहून मीच आश्चर्यचकित झाले.

असा अल्बम तुम्ही यापूर्वीच करायला हवा होतात, असे वाटत नाही का?
नक्कीच. त्या काळातील अनेक जण आज नाहीत. जुन्या काळात अनेक अभिनेते चांगले गायक होते.

तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे किशोर कुमार...
तो तर अत्यंत प्रतिभावान आणि एक चांगला मित्र होता. पण अशोक कुमार हेही चांगले गायक होते. इतकेच काय राज कपूर, शम्मी कपूर सुद्धा चांगले गायक होते. 'जीवन ज्योती' या चित्रपटात तर मी शम्मीबरोबर गायलेय सुद्धा.

तुम्ही संगीत हा तुमचा श्वास आहे, असे म्हणता. पण तुमची मुले या क्षेत्रात आली नाहीत, याबाबत कधी तुम्ही बोलला नाहीत?
(शांतता) मी त्यांना याविषयीची कल्पना दिली होती, पण मी आनंदी आहे, मी दिलेला प्रत्येक सल्ला त्यांनी मानला. माझ्याबरोबर रेकॉर्डिंग स्टु़डिओत किंवा चित्रपटात येऊ नका असे मी त्यांना बजावत असे. कारण यातून मिळणारी प्रसिद्धी त्यांच्या डोक्यात जाऊ नये असे मला वाटत होते.

पार्श्वगायनाच्या क्षेत्रातून तुम्ही आता बाजूला जात आहात?
कुणी सांगितलं तुम्हाला?

तुमची फारशी गाणी हल्ली ऐकू येत नाहीत.
याचे कारण मी माझ्या अटींवर काम करते.

PRPR
आणि याही वयात तुम्ही बरेच लाईव्ह शो करताहात....
होय. भारतातही आणि परदेशातही. माझी कामाची पद्धत वेगळी आहे. तशीच लतादिदीचीही आहे. म्हणूनच आम्ही इंडस्ट्रित स्वतःचे स्थान निर्माण करू शकलो आहोत. मी लाईव्ह शो करते, तेव्हा माझ्या काही अटी असतात. स्टेजवर मला कोणताही गोंधळ नको असतो. तो माझा शो असल्यामुळे तिथे मला श्रोत्यांना त्यांचे मनोरंजन करायचे असते. माझे संगीतकारही माझ्या सूचना पाळतात. कोणीही माझ्या शो मध्ये हस्तक्षेप करत नाही आणि मीही त्यांना तो करण्यास वाव देत नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा