महादेवची भूमिका साकारताना मजा आली : श्रेयस तळपदे
|
शाम बेनेगल यांच्या ‘वेलकम टू सज्जनपुर’ या चित्रपटाचा श्रेयस नायक आहे. खेडेगावातील अडाणी लोकांना पत्रे लिहून
देणा-या सुशिक्षित तरुणाची भूमिका त्याने साकारली आहे. शाम बेनेगल यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली,
हे आपले भाग्य असल्याचे तो मानतो. या चित्रपटाबाबत त्याला काय वाटते हे जाणून घेऊ...
‘वेलकम टू सज्जनपुर’ या चित्रपटात काम करण्याचा निर्णय कसा घेतलास?
त्याची अनेक कारणे आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाम बेनेगल हे करत असल्याचे समजताच आनंदीत झालो आणि लगेचच होकार दिला. बेनेगल यांच्याबरोबर काम करणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.
बेनेगल यांचा हा पहिला विनोदी चित्रपट आहे. याबद्दल थोडे सांगशील?
त्यांनी खरोखरीच उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे. जेव्हा मी श्यामबाबूंना भेटायला गेलो तेव्हा मला वाटले ते कडक स्वभावाचे असतील. पण, शूटिंग सुरू असताना मला त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू कळले. त्यांच्याशी गप्पा मारताना ते सगळ्यांनाच हसवायचे. शूटिंग करताना मला पिकनिकाला आल्यासारखे वाटायचे.
तुझ्या भूमिकेबद्दल थोडे सांगशील?
मी महादेव या पत्र लिहणार्या एका सुशिक्षित युवकाची भूमिका केली आहे. ही गमतीदार भूमिका आहे. गावातील अनेक लोक त्याच्याकडून पत्र लिहून घेतात आणि त्यात तो आपल्या मनातील काही ओळी घुसडून मजा घेत असतो.
सध्याचे हे मोबाईलचे युग आहे. तू व्यक्तीगत जीवनात पत्र लिहितोस का?
हो, मी अजूनही कधीतरी माझ्या पत्नीला पत्र लिहितो. माझ्या मनातील गोष्ट मी लिखित स्वरूपात अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकेन असे मला वाटते तेव्हा मी पत्र लिहितो.
तुझ्या चाहत्यांना कशा पद्धतीने उत्तर देतोस?
लोकांना वाटते आमचे पी.ए वगैरे चाहत्यांशी संवाद साधतात. पण, मी तसे करत नाही. मी स्वतः माझ्या चाहत्यांशी संवाद साधतो.
या चित्रपटाचे शूटिंग कोठे झाले?
संपूर्ण चित्रपट रामोजी स्टुडियोमध्ये शूट करण्यात आला. स्टुडियोमध्येच सज्जनपुर गाव उभारण्यात आले. केवळ एका महिन्यात शूटिंग झाले.
सहकलाकारांची साथ कशी मिळाली?
अमृता आपल्या कामाशी प्रामाणिक आहे. ती कोणतेही काम प्रामाणिकपणे करते. दिव्या कायम आनंदीत असते. आपल्या विनोदी स्वभावांनी इला अरुण इतकी हसवायची की, ती सेटवर येताच आम्ही हसू लागायचो.
या चित्रपटात तुझे भोजपुरीत संवाद आहेत. भोजपुरी बोलताना कठीण गेले असेल?
ही भाषा भोजपुरी नसून हिंदीपेक्षा थोडी वेगळी अशी बघेलखंडी आहे. मी कॉलेजमध्ये असल्यापासून वेगवेगळ्या भाषा शिकत आलो आहे. त्यामुळे फारसे अवघड गेले नाही. चित्रपटासाठी मी बघेलखंडी शिकलो. उच्चार स्पष्ट यावेत यासाठी मदतीला एक डॉयलॉग कोचही होता.
कोणते दृश्य तुला अभिनयाच्या दृष्टीने कठीण वाटले?
अमृता व माझ्यातील एका संवाद माझ्यासाठी कठीण होता. हसता हसता एकदम भावुक होण्याचे हे दृश्य मला द्यायचे होते. हे दृश्य कठीण होते.
