मी ''त्यांच्या'' सारखा नाही - शाम बेनेगल
|
'जुबेदा' आणि 'बोस' सारख्या चित्रपटांनंतर एकदम वेगळ्या धाटणीचा विनोदी चित्रपट कसा निवडला?
यामध्ये विशेष असे काही कारण नाही. चित्रपटाची कल्पनाच भन्नाट आहे. खरे सांगायचे तर 'वेलकम टू सज्जनपुर' ची पटकथा माझ्याकडे गेल्या 8-9 वर्षांपासून होती. पण, चित्रपट करण्यासाठी मलाच वेळ मिळाला नाही.
हा तुमचा पहिला कॉमेडी चित्रपट आहे. हा अनुभव कसा होता?
हा माझा पहिला कॉमेडी चित्रपट आहे असा सगळ्यांचा ग्रह झाला आहे. 'चरणदास चोर' सारखे कॉमेडी चित्रपट मी बनविले आहेत. 'वेलकम टू सज्जनपुर' हा एक हलका-फुलका निखळ मनोरंजनात्मक चित्रपट आहे. यामध्ये थोडासा रोमांसदेखील आहे.
कलाकारांची निवड कशी केली?
कलाकारांची निवड करताना मी चार गोष्टींना प्राधान्य देतो. एखादी भूमिका करण्याची त्याच्यात प्रतिभा हवी. भूमिकेला तो साजेसा हवा. आणि कामावरची निष्ठाही तितकीच महत्त्वाची आहे. श्रेयस, अमृता, दिव्या, इला अरुण, यशपाल शर्मा, राजेश्वरी या सर्वाच्यातच मी हे गुण पाहिले.
दिव्या दत्ता, राजेश्वरी सचदेव व इला अरुण यांना तुम्ही सातत्याने संधी देत आहात, याचे काही खास कारण?
दिव्याबरोबर मी तीन चित्रपट केले. राजेश्वरी आणि इलाबरोबरही अनेकवेळा काम केले. हे खरे आहे. कारण, ते अनुभवी कलाकार आहेत. माझ्या चित्रपटातील त्यांचा अभिनय मला खूप आवडला. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणे मला आवडते.
|
अजूनही आपल्या देशातील अनेक गावांमध्ये निरक्षरता आहे, हे दाखवून देण्याचा विचार आहे. ही कथा मला माझ्या ऑफिसमध्येच सुचली. ऑफिसातील अशिक्षित सफाई कामगाला त्याच्या पत्नीकडून पत्रे येत असत. पण, त्याला वाचता येत नसल्याने तो इतर कर्मचा-यांकडून वाचून घेत असे. याच प्रसंगावरून कथा सुचली.
यामध्ये बघेलखंडी या भाषेचा वापर करण्यात आला आहे. तुम्ही ही भाषा कशी जाणता, भाषेमुळे निर्मिती करताना काही समस्या आल्या का?
बघेलखंडी ही भाषा मला येत असल्याने काहीच समस्या आली नाही. इतरांच्या मदतीसाठी सेटवर डॉयलॉग कोच ठेवला होता.
कोणत्या सामाजिक गोष्टींना तुम्ही स्पर्श केला आहे?
कॉमेडी चित्रपट असला तरी निरक्षरता, विजेची समस्या, राजकारण, विधवा विवाह, अंधश्रद्धा आणि जातीवाद अशा सामाजिक गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रदत्न केला आहे. एखाद्या मुद्द्यावर भर न देता सर्वच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा माझा प्रयत्न आहे.
आपल्याला ही सामाजिक प्रेरणा कोठून मिळाली?
आपल्या समाजात या घटना होत आल्या आणि होत आहेत. काही समाजसेवक यासाठी कार्यरत आहेत. पण, काही लोक या प्रश्नांकडे डोळेझाक करतात. मी त्यांच्यासारखा नाही.
यातील कलाकारांना तुम्ही अभिनयस्वातंत्र का देता?
मी कलाकारांना अभिनयस्वातंत्र देतो तेव्हा ते आपला नैसर्गिक अभिनय करतात. आणि चित्रपटासाठी हेच तर हवे असते.
श्रेयस आणि अमृताची निवड तुम्ही कोणते चित्रपट पाहून केलीत?
खरेतर ते दोघेही प्रतिभाशाली कलाकार आहेत. आणि या भूमिकांसाठी माझी त्या दोघांनाच पहिली पसंत होती. मी 'इक्बाल' आणि 'दोर' पाहिला आहे. दोन्ही चित्रपटात त्यांचा अभिनय सुंदर आहे.
