प्रतिभावान गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे तमाम कानसेनांवर थोर उपकार आहेत. या माणसाने संगीताच्या क्षेत्रात जे काही केले त्याला हिमालयाएवढे असे विशेषण सहज लावता येईल.
संगीताच्या क्षेत्रात गुरूशिष्य परंपरा तर रहाणारच. पण तरीही या शिकवणीला एक शास्त्रीय स्वरूप देऊन, त्याचा अभ्यासक्रम, पुस्तके तयार करून, स्वरांच्या नोटेशन तयार करून पलुस्करांनी संगीत सामान्यांपर्यंत पोहोचविले.
सांगली जिल्ह्यातील कुरुंदवाड या संस्थानिक गावात १८ ऑगस्ट १८७२ मध्ये त्यांचा जन्म झाला. पलुस्करांचे वडिल दिगंबर गोपाळ पलुस्कर हे प्रख्यात कीर्तनकार. त्यामुळे त्यांच्या चिरंजीवांचे कान लहानपणापासूनच तयार झाले नसते तरच नवल. शिवाय वडिलांना साथ करण्याच्या दृष्टीकोनातून पलुस्कराना संगीताचे वारे लागले. याचवेळी ते शालेय शिक्षणही सुरू होते.
एकदा कुरुंदवाडजवळ असलेल्या नरसोबाच्या वाडीत दत्त जयंतीच्या दिनी केली जाणारी आतषबाजी पहायला लहानगा विष्णू गेला आणि तेथे उडालेल्या फटाक्याने त्याच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना अंशतः अंधत्व आले. त्याच्यावर उपचार करता करता डॉक्टरांना समजले की याचा गळा चांगला आहे. त्यांनी कुरुंदवाड संस्थानच्या राजेसाहेबांना त्याची शिफारस केली. त्यांनीही ती स्वीकारून विष्णूला बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे त्याला गाण्याची शिकवणी लावली.
बाळकृष्णबुवांनी स्वतःचे गायनाचे शिक्षण ग्वाल्हेर येथे अनेक दिग्गजांकडून घेतले होते. त्यांच्यासारख्या विद्वानाचे शिष्यत्व विष्णू दिगंबरांना खूप काही देऊन गेले. बाळकृष्णबुवांचे सारे काही टिपकागदाप्रमाणे शोषून घेऊन समृद्ध होत जाणार्या विष्णूविषयी बाकीच्या शिष्यांना मात्र मत्सर वाटू लागला. त्यांनी बाळकृष्णबुवांच्या मनात विष्णूविषयी भरवून दिले. त्यामुळे या दोघांमधील संबंधांमध्ये दरी निर्माण झाली. अखेर पलुस्करांनी आपल्या दोन मित्रांसह नाईलाजाने मिरज सोडून बडोदा गाठले. तेथील राजांसमोर गाण्याची त्यांना संधी मिळाली. त्यावेळी ग्वाल्हेरप्रमाणे बडोदा हेही संगीताला पोषक असे ठिकाण होते. बडोद्याहून त्यांनी आपली संगीतयात्रा पुढे सुरू ठेवली.
बडोद्याहून ते सौराष्ट्र, ग्वाल्हेर, मधुरा, भरतपूर, दिल्ली आणि नंतर पंजाबला पोहोचले. मथुरेला असताना ते तेथील ब्रज भाषा शिकले. हिंदूस्थानी संगीतातील अनेक चीजा या भाषेतील आहेत. सहाजिकच त्या संपूर्णपणे कळाव्या या हेतूने त्यांनी या भाषेत प्रावीण्य मिळविले.
त्यांचे पंजाबमधील वास्तव्य आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. पंजाबात अमृतसर, ओकारा येथून त्यांनी लाहोर गाठले. लाहोरला त्यांनी ५ मे १९०१ मध्ये गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. भारतीय आधुनिक संगीतातील हा टर्निंग पाईंट म्हणता येईल. गुरूकुलाश्रम पद्धतीने हे विद्यालय चालविले जात असे. संगीत विषयाचा चढता अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अंतिम परिक्षेनंतर मिळणारे प्रमाणपत्र यामुळे विद्यालय भरभराटीला आले. तेथील शिक्षणही दर्जेदार असे. विशेष म्हणजे कुणाचीही मेहेरबानी न घेता त्याचा आर्थिक गाडा चालविला जाईल. लोकांच्या देणग्या आणि पलुस्कराच्या कार्यक्रमांतून जमा होणारे पैसे हे त्याचे स्त्रोत होते. महाविद्यालयात कठोर शिस्त पाळली जाई. शिवाय नैतिक शिस्तही विद्यार्थ्यांना शिकवली जाई. त्यामुळेच या महाविद्यालयाचे सुरवातीचे शिष्य पुढे हिंदूस्थानी संगीतातील दिग्गज बनले.
|