Refresh

This website marathi.webdunia.com/maharashtra-darshan/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-108020600006_1.htm is currently offline. Cloudflare's Always Online™ shows a snapshot of this web page from the Internet Archive's Wayback Machine. To check for the live version, click Refresh.

शुक्रवार, 11 जुलै 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By मनोज पोलादे|

निसर्गरम्य फणसड अभयारण्यातून भटकंती

MH GovtMH GOVT
निसर्गाची विविधांगी रूपे याची देही याची डोळा अनुभवण्यातील आनंद अवर्णनीय असतो. कोकणातील फणसड वन्यजीव अभयारण्यात आपणांस याची प्रचीती येईल. विधात्याने सृष्टी सौंदर्याची लयलूट केलेल्या निसर्गासोबतच नयनरम्य समुद्रकिनारे हे फणसड अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. रायगड जिल्हयातील रोहा व मुरूड तालुक्यात सुमारे त्रेपन्न चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात हे अभयारण्य पसरले आहे.

जैवविविधतेने समृद्ध नटलेल्या समुद्रकिनारपट्टीलगतच्या जंगलाची विविध रूपे पाहायची ती येथेच. अभयारण्यात सुमारे एकवीस जातींच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. याशिवाय विविध वनस्पतींच्या सुमारे एक्क्यांनऊ प्रजातीं येथे आहेत. यावरून येथील जैविक विविधता लक्षात येईल. औषधी वनस्पतींचाही येथे खजिना आहे. विधात्याने नैसर्गिक जैवविविधतेची येथे लयलूट केली आहे.

सांबर, चित्ता, जंगली अस्वल या प्राण्यांचा येथील वनश्रीने नटलेल्या जंगलात मुक्त संचार आढळतो. येथील हिरव्यागार जंगलातून पक्षांच्या सुरेल सुरावटींच्या सानिध्यात मुक्त भटकंतीचा अनुभव अविस्मरणीय असतो. सुपेगावातून निसर्ग सहल नैसर्गिक सौंदर्याचा साक्षात्कार घडवते. निसर्गप्रेमींना माजगांव येथील निसर्ग केंद्रासही भेट देता येईल.
  अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल.      

अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल. ऑक्टोबर ते एप्रिल ही येथे भेटीची उत्तम वेळ आहे. निर्सगाच्या सानिध्यात काही काळ घालवायचा असल्यास येथे निवासाची व्यवस्थाही आहे.

कसे पोहचायचे?
विमान, रस्ते व रेल्वेने येथे पोहचता येते. मुंबई हे जवळचे विमानतळ आहे. कोकण रेल्वेने जायचे झाल्यास रोहा हे येथून तीस किलोमीटर अंतरावर स्टेशन आहे. मुंबईहून येथील अंतर दीडशे तर अलिबागहून पन्नास किलोमीटरवर अभयारण्य आहे.