व्यवसायाला मेंदीचा रंग
|
मेंदीच्या पारंपरिक कलेला त्यांनी व्यावसायिकतेचा दर्जा दिला. तिला परदेशात त्यातही हॉलिवूडसारख्या ठिकाणी लोकप्रियता मिळवून देणे हे काही सोपे काम नव्हते. पण बत्रा यांनी हे करून दाखविले सौंदर्य या क्षेत्रात चौदा वर्षांचा अनुभव असणार्या सुमिता स्वतः एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्या सृजनशील आहेत. उद्योजिका आहेत. लेखिका आहेत. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाची व्यवसायाशी सांगड घालणाऱ्या द्रष्ट्याही आहेत. त्यांनी आता सौंदर्यविषयक वेबसाईट सुरू करण्याचे ठरविले आहे.
इंग्लंडमध्ये जन्मलेल्या सुमिता इराण, भारत आणि अमेरिका अशा त्रिदेशांत वाढल्या. आता त्या लॉस एंजिल्समध्ये राहतात. लहानपणापासूनच सुंदर वस्तूंचे आकर्षण व ब्युटीशियन आई असल्याने सृजनशीलतेची देणगी लहानपणापासूनच त्यांना मिळाली. यामुळेच करीयरसाठी त्यांनी हे क्षेत्र निवडले.
|
पण पुढे काही वर्षांनी या कामाचा कंटाळा यायला लागल्यानंतर त्यांनी मेंदी व टिकल्यांच्या डिझाईनवर काम करणे सुरू केले. आपल्या या उत्पादनाला त्यांनी 'सेल्फ स्टिकींग बॉडी ज्वेलरी' व मेंदीला 'टेम्पररी टॅटू' हे नाव दिले. सुमिता सांगतात, याचा प्रचार एवढा झाला की माझ्या मेंदीने मोरक्कोपासून भारतापर्यंत प्रसिध्दी मिळविली.
|
त्यांनी 'द आर्ट ऑफ मेहंदी' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला अमेरिकेत मोठी प्रसिद्धी मिळाली. त्याचे कौतुकही झाले. त्या आता अमेरिकेतील प्रसिध्द व्यक्ती बनल्या आहेत. यशस्वी होण्यामागचे गुपित सांगताना त्या म्हणतात, तुम्ही काही करू इच्छित असाल तर लगेच काम सुरू करा. काही करायची मनापासून इच्छा असेल तर अशक्य काहीच नसते.
नाव व पैसा कमविल्यानंतर त्या आता भारतातील स्त्रियांसाठी एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करू इच्छित आहेत. एक दक्षिण आशियाई महिला असल्यामुळे अमेरिकेत सौंदर्य व्यवसाय सुरू करणे कठीण होते, पण अशक्य नव्हते. इथे आजही या क्षेत्रात पुरूषच पुढे आहेत मात्र महिलाही आता यात पुढे येत आहेत. म्हणूनच सुमिता बत्रा यांच्या यशाला मोठी किंमत आहे.
