आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. अत्याधुनिक युगात सुशिक्षित तरूणांसाठी नव्या व आव्हानात्मक करियरच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. रेडिओ, इंटरनेट जॉकी हे क्षेत्र तरूणांना आकर्षित करत आहे. इंटरनेट प्रेमींना या क्षेत्रात करियर करण्याची उत्तम संधी आहे. रेडिओ जॉकीमध्ये ग्लॅमर व पैसा अधिक असल्याने होतकरू तरूण या क्षेत्रात करियर करण्यासाठी धडपडताहेत.
इंटरनेटच्या माध्यमातून करियरच्याही भरपूर संधी उपलब्ध केल्या जात असतात. एफएम रेडिओ शहरापासून तर खेड्यातील जनतेपर्यंत लोकप्रिय झाले आहे. त्या माध्यमातून रेडिओ जॉकी व इंटरनेट जॉकी यांची ओळख नागरिकांना झाली आहे. भारतातही अलिकडे इंटरनेट व रेडिओ जॉकीमध्ये करियरच्या नव्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. परदेशात तर या क्षेत्राचा विकास अनेक वर्षांपूर्वीच झाला आहे. भारतात सिफी लिमिटेड या कंपनीच्या संकेतस्थळावर तरूणांसाठी करियरच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
इंटरनेट जॉकीसाठी ऑनलाइन अर्ज केला जातो. रेडिओ कंपनी आवश्यकतेनुसार उमेदवारांना कॉल पाठवित असते. निवड प्रक्रियेत दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात सामान्यज्ञानावर आधारित लेखी परीक्षा होते तर दुसर्या टप्प्यात स्क्रीन टेस्ट घेतली जात असते. एखाद्या विषयावर रूपकात्मक स्क्रीप्ट तयार करून ती संवादात्मक पद्धतीत स्क्रीनवर वाचून दाखवावी लागते. निवड प्रक्रियेत रोचक स्क्रीप्ट व व्हाइस क्वालिटीवर भर देण्यात आलेला असतो. निवड झालेल्या उमेदवारांना लाइव्ह ट्रेनिंगसाठी बोलाविले जाते. त्यात टेक्नीक, न्यूज अपडेटींग तसेच हिंदी- इंग्लिश मिश्रीत करून बोलण्याचे ट्रेनिंग दिले जाते.
रेडिओ जॉकीमध्ये करियर करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेली असावी. आकर्षक व्यक्तीमत्त्वासोबत मराठीसह, हिंदी व इंग्रजीवर प्रभुत्त्व आवश्यक असते. बोलक्या अथवा बडबड्या उमेदवारांचा आधी विचार केला जातो. परंतु उमेदवारांना कॉम्प्यूटर व इंटरनेटचे ज्ञान आवश्यक असते.
इंटरनेट जॉकी ऑफिशियल मेल आयडीच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांशी संपर्क साधला जात असतो. श्रोत्यांच्या फर्माइशनुसार कार्यक्रमात प्रस्तुती द्यावी लागत असते. इंटरनेट जॉकीमध्ये पार्टटाईम व फुलटाईम काम करता येते. होतकरू तरूणांना या क्षेत्रात खूप धम्माल करता येत असून भरपूर पैसा ही कमविता येत असतो. ट्रेनिंग झाल्यानंतर उमेदवारास 20 ते 30 हजार रूपये मासिक वेतन दिले जाते. अनुभवानुसार हे वेतनात वाढ होत असते.