एका लाकूडतोड्याची गोष्ट
मनीष शर्मा
आपण आपल्या लहानपणी ही गोष्ट ऐकलीच असेल. एक लाकूडतोड्या असतो. तो जंगलात एका झाडावर चढून लाकडे तोडत असतो. अचानक त्याच्या हातातून त्याची कुर्हाड झाडाखालच्या नदीत कोसळते आणि तो धाय मोकलून रडायला लागतो. त्याच्याकडे नवी कुर्हाड घ्यायला मुळीच पैसे नसताना आणि त्याच्या कुटुंबाचे पोट त्याच्या या कुर्हाडीवरच चालत असते. तो झाडे तोडून लाकडं विकून पैसे जमवत असतो.हे सारं वनातल्या देवाने पाहिलं असते. तो त्या लाकूडतोड्याची परीक्षा घेण्यासाठी रूप बदलून तेथे येतो आणि त्याला रडण्याचे कारण विचारतो. लाकूडतोड्या त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो आणि त्याला कुर्हाड मिळवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करतो. देव पाण्यात उडी घेतो. आधी तो एक सोन्याची कुर्हाड काढतो आणि त्या लाकूडतोड्याला विचारतो ही का तुझी कुर्हाड? लाकूडतोड्या नाही म्हणतो. मग देव चांदीची कुर्हाड काढतो लाकूडतोड्या त्यालाही नाही म्हणतो. मग देव त्याची खरी कुर्हाड काढतो आणि विचारतो त्याला अत्यानंद होतो. तीच त्याची खरी कुर्हाड असते. देव आपल्या खऱ्या रूपात येतो आणि विचारतो मी तुला आधी सोने आणि चांदीची कुर्हाड दिली, तरी तू त्याला नाही का म्हणालास? लाकूडतोड्या देवाला सांगतो, प्रभू माफ करा परंतु जी वस्तू माझी नाही तिला मी माझी का म्ह़णू? उगाच मी ती वस्तू घ्यायची आणि नंतर माझी झोप खराब करून घ्यायची याला काय अर्थ? म्हणून मी नाही म्हणालो. देव त्याच्या या उत्तरावर खूश होत त्याला त्या तीनही कुर्हाडी भेट देतो.पाहा कथा किती छोटी आहे, परंतु त्यातून निघणारा अर्थ किती विशाल आहे. जर तुम्ही तुमचे काम अगदी प्रामाणिकपणे केले तर, देव आणि दैवं तुम्हाला कितीतरी पटीने अधिक देते. म्हणून तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते अगदी प्रामाणिकपणे करा, तुम्हाला त्यातून नक्कीच यश मिळेल यात शंका नाही.