1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा

पंडित विष्णुशर्माची प्रतिज्ञा

WD
ही फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्याकाळी दक्षिणेकडील महिलारोप्य नावाचा प्रदेश होता. त्या प्रदेशावर अमरशक्ती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यातली प्रजा अतिशय सुखी आणि आनंदी होती. राजाकडील सर्व दरबारी लोक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक होते. कोणत्याही शत्रूची या राज्यावर वाकडी नजर होणेही शक्य नव्हते. अशा गुणवान आणि कर्तव्यदक्ष राजाला मोठे दु:ख होते. त्याच्या दु:खाचे कारण त्याला असलेल्या तीन मुलांमध्येच होते. राजाला बहुशक्ती, अनेकशक्ती व उग्रशक्ती असे तीन मुलगे होते.

पण तिघेही महामूर्ख होते. कोणतीही गोष्ट शिकण्याची त्यांची इच्छा तर नसेच पण कोणी शिकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या डोक्यात काही शिरेल तर शप्पथ ! आपल्या पश्चात एवढे वैभवसंपन्न राज्य सांभाळण्यासाठी आपल्या तीनही मुलांचाकाहीच उपयोग नाही. या काळजीमुळे राजा रात्रंदिवस झुरत होता.

WD
एके दिवशी त्याने नगरतल्या सर्व विद्वान पंडितांची सभा बोलावली. त्या सभेत सर्व विद्वान पंडितांना आवाहन करीत राजा आपली व्यथा सांगू लागतो. ''मुलगा झाला नाही किंवा होऊन मेला तरी एकवेळ परवडेल पण तो महामूर्ख असण हे त्याच्या मात्यापित्यांना अंतर्मामी सलणारे कायमचे दु:ख आहे. तुम्ही आज अनेक विषयातील पंडित आहात. आपल्यापैकी कोणीही पंडित माझ्या तिन्ही मुलांना शिकवून शहाणे करील त्याला मी हवे तितके द्रव्य देईन.''

राजाचे बोलणे ऐकताच जवळ जवळ सर्वच प‍ंडितांनी माना खाली घातल्या. त्याचवेळी विष्णुशर्मा नावाच्या विद्वान पंडिताने राजाला उठून सांगितले की, ''राजा ! मी प्रतिज्ञेवर तुला सांगतो की केवळ सहा महिन्यांच्याकालावधीत तुझ्या तिन्ही मुलांना शहाणे करून दाखवतो. पण माझी विद्या मी विक्रीस काढलेली नसल्याने मला तुझे धन मुळीच नको. हां ! फक्त एवढेच मी आता सांगतो की ही माझी प्रतिज्ञा भंग पावली तर मी माझे नाव बदलेन.''

राजा पंडित विष्णुशर्माच्या प्रतिज्ञेमुळे अचंबित झाला पण त्याचे मन मात्र अतिशय आनंदित झाले. राजाने विष्णुशर्माचा मोठा सत्कार करून आपल्या तिन्ही मुलांना त्याच्या स्वाधीन केले.

WD
पंडित विष्णुशर्माने त्या मुलांना आपल्या आश्रमात आणल्यावर पाच तंत्रे तयार करून त्या तंत्राला अनुसरून असलेल्या कथांवरून राजाच्या तिनही मुलांना व्यवहारकुशल बनवले. ते सुद्धा फक्त सहा महिन्यात.

ही पाच तंत्रे अशी आहेत - मित्रभेद, मित्रप्राप्ती, काकोलूकीय, लब्धप्रणाश आणि अपरीक्षितकारक. या पाच तंत्रातील कथा शिकूनच ते राजकुमार शहाणे झाले. या पाच तंत्रातील कथासंग्रहाला पंचतंत्र म्हणतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा