तीव्र मतभेद असतानाही हे दोघे एकमेकावंर प्रेम करीत. सार्वजनिक वादात शिवीगाळ झाली असतानाही अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहित असता टिळक घळाघळा रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही.
या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.``
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय. यात शंका नाही.``
यानंतर 21 वर्षांनी म्हणजे 1916 मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते, ``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनु्ष्यासहि दारिद्र्यांत राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखरे गावा लागतो.``
``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्रापत् करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेऊन संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरूषच खरे धीर पुरूष होत``
आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्रीत मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी ही दोन्ही माणसे होती.
(संदर्भः लोकमान्य टिळक चरित्रः लेखक न. चिं. केळकर)
|