त्याचवेळी समाजातील खालच्या स्तरातील परप्रांतीय जे किरकोळ नोकरी धंद्यासाठी बंगालमध्ये येतात, त्यांना फार काळ हिंदीत बोलून चालत नाही. कारण स्थानिक बंगाली लोक स्वभाषेसाठी आग्रही असल्याने ते हिंदी लोकांशी जास्त व्यवहार करण्याच्या भानगडीत पडत नाही. शिवाय लिपी वेगळी असल्याचाही परिणाम असेल, पण सर्वसामान्य बंगाली माणसालाही हिंदी इतकी चांगली कळत नाही. बोलणे तर दूरच. मग त्याच्याशी संपर्क साधायला बाहेरच्या माणसाला बंगाली शिकावीच लागते. कारण त्याला त्या भाषिक लोकांशी व्यवसाय करायचा असतो.
कलाक्षेत्रात बंगाली लोकांचे योगदान फार मोठे आहे. हिंदीतही ते आहे. अगदी बिमल रॉय, मृणाल सेन, ऋत्विक घटक, बर्मन पितापुत्र, अनिल विश्वास, सलील चौधरी, मन्ना डे, किशोर कुमार अशी किती नावे घ्यावीत. या मंडळींनी काम हिंदीत केले तरी बंगाली ही ओळख जपली. कारण ते बंगाली चित्रपटांशीही जोडले गेले होते. म्हणूनच बॉलीवूडच्या अनेक कलावंतांनी बंगालीत काम केले. बंगालीतील गुणवंतांचा प्रवाह अजूनही सुरू आहे. राणी मुखर्जी, बिपाशा बासू, विद्या बालन संगीतकार प्रीतम, गायक शान असे अनेक बंगाली कलावंत हिंदीत कार्यरत आहेत. या एकूणच समृद्ध परंपरेमुळे बंगाली लोकांकडे पहाण्याचा बॉलीवूडचा दृष्टिकोनही आदराचा आहे. याशिवाय सत्यजित राय, ऋतुपर्ण घोष, अपर्णा सेन हे दिग्दर्शकही बंगालीत काम करूनही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावून आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात काम करणे ही बाब बॉलीवूडच्या कलावंतांसाठी अभिमानस्पद ठरते.
| | अगदी आताही राणी मुखर्जी, बिपाशा बासू, संगीतकार प्रीतम, गायक शान असे अनेक बंगाली हिंदीत कार्यरत आहेत. यामुळे बंगाली लोकांकडे पहाण्याचा बॉलीवूडचा दृष्टिकोनही आदराचा आहे. |
| |
महाराष्ट्रात सृजनशील मराठी कलावंत असूनही त्यांच्या कलाकृतींना रसिकमान्यता मिळत नसल्याचे ऐकिवात येते. पण बंगालीत तसे घडत नाही. बंगाली चित्रपट आजही मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. बंगाली चित्रपटांवर चालणारी अनेक सिने साप्ताहिकेही आहेत. बंगाली गाणी आजही मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. शिवाय रवींद्र संगीत, नजरूल संगीत यांची अत्यंत अभिमानस्पद अशी परंपरा आहे. त्याचवेळी बंगाली अस्मितेचा तो भाग आहे.
हे सगळे झाले, भाषा आणि संस्कृतीबद्दल. याचा अर्थ येणार्या परप्रांतीय लोंढ्यांबद्दल सामान्य बंगाली लोकांत अस्वस्थता नाही, असे नाही. ही नाराजी असली तरी ती कुठेही जाहिररित्या प्रकट झालेली नाही. पण त्याचवेळी त्यांचे आमची संस्कृती, भाषा यावर अतिक्रमण होत असेल तर ते रोखायला हवे ही आंतरीक भावनाही त्यात आहे. म्हणूनच की काय बंगाली माणूस आपल्या भाषेला आणि संस्कृतीला चिकटून असतो. त्यामुळे परप्रांतीयांना बंगालींवर वर्चस्व गाजविता येत नाही. परप्रांतीयांची आपल्या भाषेची पॉकेट्स तयार होत असली तरी बाह्य जगात त्यांना बंगालीत व्यवहार केल्याशिवाय चालत नाही. मुंबईत नेमके हेच घडत नसावे.
| | इतकेच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्याही त्यांच्या जाहिराती बंगालीत करतात. त्यांची होर्डिंग्ज बंगाली भाषेतच लावतात. शाळेतही बर्याच प्रमाणात बंगाली भाषा अनिवार्य आहे. |
| |
छटपूजा वगैरे प्रकार कोलकत्यातही होतात. पण त्याचे प्रमाण कमी असते. त्याला स्थानिक पक्षांचे लोक जातात. पण त्याचा हेतू आपली 'व्होट बॅंक' जपणे हेच असते. बाहेरून येथे येऊन बिहारी किंवा युपीचे नेते राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण ते शक्य नाही, याची त्यांना जाणीव असते. कारण समग्र बंगाली लोकांशी ते कोणत्याही प्रकारे जोडले जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच कदाचित परप्रांतीयांचे राजकीय वर्चस्व तयार होऊ शकलेले नाही.
मुंबई व महाराष्ट्राप्रमाणे दुकानांवर इंग्रजीत बोर्ड कोलकत्यातही दिसतात. पण त्याविरोधात नाराजीही आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार गांगुली यांनी या विरोधात आंदोलन छेडले होते. त्याला प्रतिसादही मिळाला आणि बर्याच प्रमाणात आता बंगालीतही बोर्ड दिसू लागले आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्याही त्यांच्या जाहिराती बंगालीत करतात. त्यांची होर्डिंग्ज बंगाली भाषेतच लावतात. शाळेतही बर्याच प्रमाणात बंगाली भाषा अनिवार्य आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या शाळाही बंगाली भाषा शिकवतात.
भाषा टिकवायसाठी तिचा मुळात अभिमान हवा. नुसता अभिमान असून चालणार नाही, तिचा वापरही आवर्जून करायला हवा. आपल्या भाषेतील लोकांशी मातृभाषेतच बोलायला हवे. त्या राज्यात रहाणार्या परप्रांतीयालाही ती भाषा शिकावी अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. तरच परप्रांतीयांना स्थानिक भाषेचे महत्त्व वाटेल. शिवाय स्वभाषिक साहित्य, कला, चित्रपटत नाटक आदींचा आस्वाद घ्यायला हवा. तरच भाषा टिकेल. अन्यथा जागतिकीकरणाच्या काळात सांस्कृतिक सपाटीकरण होऊन प्रादेशिक भाषा भुईसपाट होऊन जातील आणि मग आपणच आपली ओळख हरवून बसू. (शब्दांकनः अभिनय कुलकर्णी)
( लेखक बंगालीतील ज्येष्ठ पत्रकार आहेत.) |