ध्यान- एक मनोदैहिक प्रक्रिया
जयंत जोशी
|
ध्यानाचा संबंध मन, मेंदू, देव, मोक्ष किंवा अध्यात्माबरोबरच शरीराशीही तेवढाच आहे. याशिवाय निसर्गात जे काही दिसते त्या सर्वांचा संबंध ध्यानाशी आहे.
|
पूजेसाठी ज्याप्रमाणे विविध वस्तूंची गरज असते. त्याप्रमाणे ध्यनासाठीही अनेक प्रकारची सामग्री आणली जाते. पण सर्व काही केल्यानंतर आपण डोळे बंद करतो तेव्हा लक्षात येते आपले मन किती चंचल आहे ते. एका ठिकाणी टिकतच नाही. खरेतर ध्यान ही काही करण्याची क्रिया नाही. काहीच न करणे आणि कोणताही विचार न करणे म्हणजेच ध्यान आहे. मनाच्या पाटीवरची सर्व अक्षरे धुऊन पुसून काढून पाटी स्वच्छ करणे हेच ध्यानाचे कार्य आहे.
शरीर हाही मनाचाच एक भाग आहे. मनाचे स्थूल रूप आहे शरीर. आपल्या शरीरात खरे तर तीन शरीरे असतात. एक भौतिक शरीर जे आपल्याला डोळ्यांनी दिसते ते. दुसरे मनरूपी शरीर. जे दिसत नाही, पण त्याचे असित्व आहे. आणि तिसरे चेतन शरीर. भौतिक आणि चेतन शरीराच्या मध्ये मनरूपी शरीर आहे. या तीनही देहावस्था एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. तिघांना वेगळे करणे कठिण आहे. याचे कारण आहे, चंचल असलेले मन. जर हे मन ध्यानाद्वारे स्थिर झाले तर या तिन्ही देहावस्था आपल्याला पाहता येतात. त्यांचे मूळ स्वरूप आपल्याला दिसू शकते. अनुभवता येते. मनाला दोन प्रकारच्या गती आहेत बाह्य आणि आंतरीक. भौतिक पदार्थांच्या दिशेने जाते ती बाह्य गती आणि आंतरिक गती म्हणजेच ध्यान.
