मंगळवार, 16 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (09:17 IST)

महापरिनिर्वाण दिन ऑनलाईन साजरा होणार, चैत्यभूमीवरून शासकीय मानवंदनेचे थेट प्रक्षेपण होणार

mahaparinirvan din
महापरिनिर्वाण दिनी राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो अनुयायी 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदा चैत्यभूमीवरून शासकीय मानवंदनेचे थेट प्रक्षेपण होणार असून महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे. 
 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेता यंदा राज्य शासनासह महानगर पालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महापरिनिर्वाण दिन निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे सुरू असलेल्या पूर्वतयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. चैत्यभूमी भागातील पुष्प सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती आदी सर्व नियमित कामांचा आढावा आयुक्त जयस्वाल यांनी घेतला. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 
 
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. या कारणाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही.