गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By मनोज पोलादे|

गोपीनाथ मुंडे नावाचं रसिक व्यक्तिमत्व

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांचा आज 58 वा (12 डिसेंबर) वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तीमत्वाचा घेतलेला वेध.

मुंडे राजकारणात असूनही रसिक व्यक्तिमत्व आहे. राजकारणाच्या धकाधकीतूनही त्यांनी आपल्या आवडी जपल्या आहेत. त्यांना मराठी नाटक खूप आवडते. व्यस्ततेतून वेळ मिळाली की ते नाटकाचा आनंद घेतात. महाविद्यालयीन जीवनापासूनचा वाचनाचा छंदही त्यांनी मनापासून जोपासला आहे. आत्मचरित्रात्क ग्रंथ त्यांना विशेष आवडते. सामाजिक कार्यासाठी तो त्यांचा प्रेरणास्‍त्रोत आहे. आपणांस ऐकायला मजेशीर वाटेल मात्र मुंडे साहेबांना शेंभदाने खायला आवडतात. मात्र डॉक्टरांच्या मनाईमुळे घरच्यांचे लक्ष चुकवून त्यांना आवड पूर्ण करावी लागते.

मुंडेंचा राजकीय प्रवास हेवा वाटणारा आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागातून सुरूवात करून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचले. मात्र त्यांच्या आवडी- निवडी अगदी पूर्वीप्रमाणेच सामान्य राहील्या. सामान्यत्व जपण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. भाज्यांमध्ये भेंडी व कारले त्यांना विशेष पसंत आहे. ‍शीखरावर पोहचल्यानंतरही त्यांनी ग्रामीण भागाशी, मित्रांशी ऋणानुबंध कायम ठेवले आहेत. बालपणीचे व शालेय, महाविद्यालयीन जीवनापासूनच्या मित्रांशी त्यांचा आजही जिव्हाळा कायम आहे. ऐकमेकांना संबोधनही ऐकेरीच असते. त्यात कोठेही कृत्रिमपणा येवू न देण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. राज्यभर त्यांच्या मित्रांचा गोतावळा पसरला आहे. भटकंतीत संधी सापडेल तेव्हा मित्रांकडे थांबण्यास ते विसरत नाहीत.

समाजकारणातून राजकारणाची पायरी चढत असतानाच दुसरीकडे व्यक्तीगत आयुष्यात पत्नी प्रज्ञा यांचे आगमन झाले. लग्नाची मागणी घातल्यानंतर प्रज्ञा यांनी दिलेला होकार, हा आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण असल्याचे ते सांगतात. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी काही नाटकांमधून अभिनय केला. एवढीच काय ती त्यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द. कलेच्या आस्वादाची दृष्टी त्यांना लाभली आहे. मात्र एका कलेत ते अगदी पारंगत आहे. ती आहे राजकारणाची कला. होय राजकारणासही ते कलाच मानतात. विद्यात्याने हातात कला नाही दिली म्हणून काय झाले, इकडची भरपाई तिकडे करायची झाले.

सार्वजनिक जीवनात व्यक्तीगत आयुष्यावर मर्यादा येतातच. मुंडेही त्यास अपवाद नाहीत. युती सरकारच्या काळात राज्याचे गृहमंत्रीपदाच्या कालखंडात त्यांनी राज्याचे गृहमंत्रालय आत्मविश्वासाने सांभाळले मात्र घरातील गृहमंत्र्यांचा रोष सहन करावा लागला. याकाळात घरच्यांना वेळ देणे जमले नाही. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा.

मात्र त्यावर त्यांनी तेव्हा पर्याय शोधला होता. गप्प राहण्याचा. त्यांची छोटी मुलगी यशश्रीही त्यांच्यासारखीच बंडखोर, हट्टी स्वभावाची. तिच्यासमोर मात्र ते सपशेल शरणागती पत्करतात. मुड ठिक नसला की ‍तिच्याशी गप्पा मारतात, खेळतात. यामुळे निराशा कोठल्या कोठे पळून जाते, असे ते सांगतात.

विरोधी पक्षनेते असताना एनरॉन प्रकल्प समुद्रात बुडवण्याची वल्गना करणार्‍या मुंडे साहेबांना सत्तेत आल्यानंतर उर्जामंत्र्याच्या नात्याने त्यांच्याशी पुनर्वाटाघाटी करण्यास भाग पडले. राजकीय नेते म्हणून हा कालखंड त्यांच्यासाठी निश्चितच परिक्षा पाहणारा होता. मात्र सामाजिकतेच्या पायावर राजकीय कारकीर्द उभारणार्‍या नेत्यांची नौका छोट्या-मोठ्या वादळाने भरकटत नसते. आपण स्वत: ख्यातनाम वक्ते नसल्याचे ते निसंकोचपणे सांगतात.

वक्तृत्वाबाबत बापुसाहेब काळदाते, शिवाजीरांव भोसले, अटलजी त्यांचे आदर्श आहेत. मात्र तरीही ते मैदान गाजवतात हे कसे? अभ्यासू दृष्टी व लोकांच्या अनुभवातून ते वक्तृत्व सजवतात. त्याला मनोरंजनाची जोड देवून मैदान मारतात. कारण अपदी साधे आहे, त्यांचे भाषण उत्स्फूर्त असते. लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न, किस्से घेवून ते संवाद साधत असतात. नेते म्हटले की भाषणबाजी आलीच.

मागिल वर्षी पावसाळ्यात गोदावरीच्या पुराने मराठवाड्यात प्रचंड नुकसान झाले. त्या कठिण परिस्थितीत मुंडे मतदीसाठी धावून गेले. त्यांनी संपूर्ण भाग पायदळी तुडवत 'गोदा परिक्रमा' केली. लोकांचे सुखदु:ख जाणून घेतले, त्यांच्या पाठीवर सहानुभूतीचा हात फिरवला, सरकारचे लक्ष वेधले. मुंडेंवर वसंतराव भागवतांच्या वक्तीमत्वाचा ठसा आहे.

महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी सामाजिक व राजकीय वाटेवरच्या प्रवासास सुरूवात केली. वसंतरावांसारखे सहृदय व पारदर्शक व्यक्तीमत्वाचे दर्शन होणे नाही, असे ते आवर्जून सांगतात. त्याच्याकडून त्यांनी 'बोले तैसा चाले' मंत्र आत्मसात केला. म्हणूनच युतीची सत्ता गेली मात्र मुंडेच्या विश्वासाहार्यतेस तडा गेला नाही.

प्रदिर्घकाळ जनसंघ व प्रदेश भाजपाध्यक्षपद सांभाळणार्‍या उत्तमराव पाटलांच्या व्यक्तीमत्वानेही ते प्रभावित झाले आहेत. सद्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असणारे गोपीनाथ मुडेंनी युती सरकारच्या काळात राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्रीपद सांभाळले आहे, मात्र मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा अद्यापपर्यंत फळाला आलेली नाही. वा‍ढीदिवशी त्यांना त्यासाठी शुभेच्छा!