राणेंना मुख्यमंत्रिपदाची संधी किती?
- अभिनय कुलकर्णी
|
------
राणेंचे प्लस पॉईंट
आक्रमकपणा- राणेंचा आक्रमकपणा, सडेतोडपणा आणि मनात येईल ते बोलणे हा गुण अनेकांना आवडतो. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात लपवाछपवीला स्थान नाही. अंगावर येईल, त्याला शिंगावर घेण्याची त्यांची तयारी असते.
महाराष्ट्रव्यापी नेतृत्व- राणेंचे वर्चस्व कोकणात जास्त असले तरी त्यांना एक राज्यव्यापी ओळख आहे. त्यांचे समर्थकही राज्याच्या इतर भागातही पसरलेले आहेत. असे नेतृत्व कॉंग्रेसकडेही आत्ता नाही. म्हणूनच राणेंच्या जीवावर नक्कीच काही आमदार निवडून येऊ शकतात. ती ताकद आज क़ॉंग्रेसच्या नेत्यांत नाही.
कार्यकर्त्यांचे ‘दादा’ - राणेंच्या मागे जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे बळ आहे. ते फक्त कोकणातच नव्हे, तर राज्याच्या इतर भागातही आहे. राणे चाहत्यांच्या, समर्थकांच्या मागे ठामपणे उभे रहातात. म्हणूनच त्यांनी आपल्याबरोबर फुटलेल्या आमदारांना पुन्हा निवडून आणलं. त्यांच्यासाठी ताकद लावली. म्हणूनच कायकर्ते ‘दादां’च्या मागे ठामपणे उभे रहातात.
पक्षापलीकडे मैत्री- राणेंनी शिवसेना सोडली तरी त्यांचे आजही शिवसेनेतील अनेक नेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे गोपीनाथ मुंडे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजितदादा पवार यांच्याशी त्यांची असलेली मैत्रीही लपून राहिलेली नाही.
राणेंचे मायनस पॉईंट
आक्रमकपणा- राणेंचा आक्रमकपणा त्यांच्या स्वभावाला मारक आहे. शिवसेनेत असताना हाच गुण तिथे ते फायदेशीर होता, पण त्या तुलनेत कॉंग्रेस हा मवाळ पक्ष आहे. तिथली कार्यपद्धती राणेंच्या स्वभावाशी जुळणारी नाही.
प्रभाव कोकणातच- राणेंचे चाहते राज्यभर असले तरी त्यांचा खरा प्रभाव कोकणातच आणि तोही तळकोकणातच असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच राणेंचे बंडखोर आमदार निवडून येत असताना रायगडात मात्र त्यांचा उमेदवार पडला. त्याचप्रमाणे विदर्भात खासदारकीला उभ्या असलेल्या सुबोध मोहितेंना पराभव पत्करावा लागला.
एककल्ली नेतृत्व- सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यांना जे वाटते तेच करतात. फटकळपणामुळे त्यांच्यापासून दुखावलेले अनेक जण त्यांच्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात.
कॉंग्रेसी संस्कृतीला उपरे- राणे शिवसेनेच्या संस्कृतीत वाढले आहेत. क़ॉंग्रेसची मॅडम, हायकमांड, खुषमस्करे संस्कृती त्यांना पचणारी नाही. शिवसेनेत त्यांच्या शब्दाला वजन होते. ते आज कॉंग्रेसमध्ये नाही. राणेंचा आक्रमकपणा हायकमांडलाही खुपतो.त्याचबरोबर काहीही झाले तरी तरी राणे 'बाहेरचे' आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात मोठे केल्यास आपले काही खरे नाही, याची भीतीही कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनाही आहे.
कॉंग्रेसमधील विरोधक- राणेंनी मुख्यमंत्रिपदाची मनीषा कधी लपवून ठेवली नाही. त्यामुळे विलासरावांशी त्यांनी उघड वैर पत्करले. त्याचवेली मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा असलेले पतंगराव कदम, अशोक चव्हाण, रोहिदास पाटील हेही त्यांच्या विरोधात गेले. आता मुख्यमंत्रिपदासाठी सुशीलकुमार शिंदेचेही नाव घेतले जात आहे. म्हणजे तेही राणेंच्या विरोधकांतच आले.
पुढे काय?
हे सगळे पाहिल्यावर राणेंचे भवितव्य काय असेल असा प्रश्न पडतो. राणेंना मुख्यमंत्री करू न देण्यासाठी कॉंग्रेसी नेते टपलेले आहेत. दुसरीकडे राणे डोईजड होऊ नये म्हणून हायकमांडही त्यांना सबुरीने हाताळते आहे. त्याचवेळी राणे मुख्यमंत्रिपदाच्या महत्वाकांक्षाने अधीर झाले आहेत. हे सगळे पाहिल्यावर राणेंना कॉंग्रेस फार काळ मानवेल, असे म्हणायला जीभ रेटत नाही. आणि नेत्यांपैकी एक ही 'ओळख' बनवून घ्यायला राणेही तयार नसतील. त्यामुळे राणेंचे एकूण भवितव्य सध्या तरी अनिश्चित दिसते आहे.
