मंथन | बाबा आमटे | मराठी दिन | गांधी जयंती | सावरकर | ब्लॉग-कॉर्नर
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आज-काल » मंथन » पंचशील : नव्या युगाचे
Feedback Print Bookmark and Share
 

(जडण-घडण मासिक आणि सह्याद्री प्रकाशन यांच्या वतीने स्मिता देशपांडे यांनी अनुवादित केलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे 'पंचशील : नव्या युगाचे' हे पुस्तक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित झाले. डॉ. माशेलकर यांचे या पुस्तकातील काही विचार....)

mashelkar
MH GOVT
आपल्या सर्वांनाच आठवत असेल, 3 जानेवारी 2000 रोजी पुण्यामध्ये राष्ट्रीय सायन्स काँग्रेस भरवण्यात आली होती. सुमारे पाच हजार शास्त्रज्ञ आणि इतर पाहुणे उद्‍घाटनाच्या समारंभाला हजर होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या बरोबरीनं शरद पवार, डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम (जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले) हजर होते. या सायन्स काँग्रेसमध्ये दोन-तीन गोष्टी पूर्वीच्या सायन्स काँग्रेसपेक्षा वेगळ्या होत्या. त्यामुळेच ही सायन्स काँग्रेस पूर्वीच्या सायन्स काँग्रेसपेक्षा उठावदार ठरली.

पुण्यातील या मुख्य सायन्स काँग्रेसच्या जोडीनं 'चिल्ड्रेन्स सायन्स काँग्रेस' भरविण्यात आली होती. 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्साहाने भाग घेतला. ती भाषणं करत होती. नवनवीन प्रयोग करत होती, संयोजन करत होती आणि त्यामध्ये प्रेक्षक, सहभागी होणारे विद्यार्थी खूपच होते. पुणे सायन्स काँग्रेसचं अजून एक वैशिष्टय म्हणजे त्यामध्ये केवळ शास्त्रज्ञच आले नव्हते, तर शास्त्रांव्यतिरिक्त इतर ज्या ज्ञानशाखा आहेत त्याही पाहणं महत्त्वाचं असल्यामुळे आम्ही ज्याला नवनिर्माणकर्ते म्हणतो, (Grass Root Innovators), तेही या सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते, मग ते कारागीर असोत किंवा शेतकरी, किंवा अशिक्षित नवसर्जनशील असोत, त्यांनी केलेल्या कामाचं एक प्रदर्शन त्या वेळी झालं होतं. मला आठवतंय, ज्या व्यासपीठावरून नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञांची भाषणं झाली होती त्याच व्यासपीठावरून या अशिक्षित नवनिर्माणकर्त्यांची भाषणं झाली आणि नोबेल पुरस्कारविजेत्यांना जो टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला त्याच्यापेक्षा किती तरी अधिक प्रतिसाद यांना मिळाला. त्यांनी त्याच्या भाषेत त्यांचे विचार मांडले. त्यांना मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद अजूनही माझ्या कानात घुमतो आहे.... खूपच अभूतपूर्व होते ते सगळं.

या सायन्स काँग्रेसमध्ये आणखी एक उपक्रम वेगळा होता. त्या वेळी एक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. भारताने आतापर्यंत ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांच्या क्षेत्रात जे काही मिळवलंय त्याच्या संदर्भात हे प्रदर्शन होतं. मिसाईलच्या प्रतिकृतीपासून 'इंडिका' ही नवीन गाडी त्याचवेळेस बाजारात आली होती. तीसुद्धा या प्रदर्शनात ठेवली होती. त्या सुमारास 'कारगिल युद्ध' नुकतंच संपलं होतं. त्यावर आधारित संरक्षणाविषयक प्रदर्शनही इथं भरवण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे या प्रदर्शनांना खूप गर्दी झाली होती. मला अजून आठवतं की, काही वर्तमानपत्रांचे मथळे होते ' Science Congress Causes Traffic Jams' अशी अलोट गर्दी या सायन्स काँग्रेसला झाली होती. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी मुलांना हे प्रदर्शन पाहायला अगदी पुणे विद्यापीठातून शिवाजीनगर स्टेशनपर्यंत रांगाच्या रांगा लागल्या होत्या. अशा प्रकारचं प्रदर्शन याच्या आधी कोणीही बघितलं नव्हतं.

या सायन्स काँग्रेसमध्ये मी 'नवीन सहस्त्रकाचं नवीन पंचशील' या विषयावर भाषण केलं होतं. त्याचे पाच मुद्दे होते ते म्हणजे -
1. बालककेंद्रीत शिक्षण (Child Centred Education)
2. महिलाकेंद्रित कुटुंब (Women Centred Family)
3. मानवकेंद्रितविकास (Human Centred Development)
4. ज्ञानकेंद्रित समाज (Knowledge Centred Society)
5. नवनिर्मितीकेंद्रित भारत (Innovation Centred India)

सांगायला अत्यंत आनंद होतो की, या भाषणाचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये उमटले. त्याच्या प्रतिक्रिया मला लगेच मिळाल्या. उद्‍घाटनाचा कार्यक्रम दुपारी संपला. सर्वांत शेवटचं भाषण पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं होतं. त्यानंतर आम्ही भोजनासाठी गेलो. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नोबेल पुरस्कारविजेते प्रो. लेन, नोबेल पुरस्कारविजेते प्रो. अन्र्स्ट, प्रो. एम. जी. के. मेनन असे आम्ही एकत्र होतो. त्या वेळी मी मांडलेल्या पाच मुद्यांवर अनौपचारिक चर्चा झाली. त्यातील बालककेंद्रित शिक्षण हा मुद्दा महत्त्वाचा होता. हा मुद्दा मी मांडताना माझ्या शाळेतील भावेसरांचा उल्लेख केला होता. एकदा त्यांनी आम्हाला बाहेर नेलं आणि भिंगाचा प्रयोग दाखवला. भिंग सूर्यप्रकाशात धरलं आणि त्याखाली कागद ठेवला. काही क्षणातच तो जळू लागला. त्या भिंगाच्या नाभीय अंतरावर (फोकल लेन्थ) सूर्यप्रकाशातून येणारे किरण एकत्र येतात आणि एखादा कागदही जळू लागतो. आम्ही सगळेत आश्चर्यचकित झालो. ते माझ्याकडे वळून म्हणाले, 'माशेलकर, तुमच्या शक्ती अशाच एकत्रिक केल्या तर जगात तुम्हाला अशक्य म्हणून काही नसतं.' विज्ञानाच्या शक्तीनं मला प्रभावित केलं. त्याच वेळेला मी ठरवलं की मी वैज्ञानिक होणार. भावेसरांच्या त्या वाक्यानं मला माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान, सूत्रही मिळालं. 'जर आपण फोकस केलं, शक्ती केंद्रिक केल्या तर तुम्ही काहीही करू शकता...'