इंटरव्ह्यू मोलकरणीचा
|
अपर्णा घरी येते, दारावरची बेल वाजते.
अपर्णा - थांबा उघडते
समोर रखमा मी कामवाली. अग बाई किती अपटूडेट अन् मेकअप पण केवढा ! मनात म्हटलं कोण म्हणेल हिला कामवाली ! हळूच आपल्या साडीकडे बघून घेतलं.
रखमा - मी रखमा जी ! 24 फ्लॉट मधल्या मेमसाबजीनी तुमचं काम सांगितलाय ना म्हणून आली. अ. अग कोण त्या बेलसरे.
रखमा - नाही जी त्या मोठं नाव हाय त्यांच
अपर्णा - बरं असू दे हे बोल काम काय काय करशील काय घेशील अन् केव्हा येशील ?
रखमा - बघा बाई मी त्या 24, 25, 28 फ्लॉट मधी काम करतो. एका ठिकाणी हजार, दुसर्या ठिकाणी दीड हजार अन् तिसर्या ठिकाणी पाचशे रुपये नुसता भांडी अन् स्वयंपाक घर पुसतो. दोन घरी झाडू पोचा अन् भांडे अन् पुसणं पासण.
अपर्णा - हे बघ रखमा माझ्या कडे पोचा लावायचा अन् भांडी घासायची सकाळी मी झाडून ठेवते काय घेणार?
रखमा - सहाशे रुपये जी अन् दोन वाजे पावेता येणार आठ दिवसांत एक सुट्टी मग आजारी वगैरे मिळून सहा एक सुट्ट्या होतात, डॉक्टरकडे जावं लागत मला तपासाले.
|
बाई मला कस जमलं माझे साहेब कामावर गेल्यावर मी घरून निघतो तवा अकरा वाजते मग 24 फ्लॅट मध्ये 1 वाजतो, 25 मध्ये 2 तर होतातच आनी तिसर्या घरी 3 वाजते त्या नंतर तुमच्या कडे येन जमल.
अपर्णा - हो का गं मग मी दुसरी बघते. रखमा जाते. थोड्या वेळात सखू बाई येतात.
अपर्णा - कोण काम करायला? काय नावं?
सखू बाई - हो जी म्या सखूबाई त्या पांढरीपांडे बाई आहे ना! त्यांनी पाठवलंय - म्हने जा ग बाई त्यांना लई त्रास होतोये काम करायला खूप मोलकरणी झाल्या कूनी बी टिकत नाही तर तू कर बाई.
अपर्णा - हो का ग मला वाटलंच की जाताना रखमा काही तरी हिला बोलेल तेव्हा हिला तिनं पढवलं असणार. पण बाई वागायला बरी दिसली.
म्हटलं सखू बाई काम करणार? काय घेणार अन् केव्हा येणार?
सखू बाई - बाईजी मी पहिले जी घर है ती करून मग दोन वाजे पावतो येऊ सकतो. घेणार आठशे रुपये बघा धुणं भांडे, झाडू पोचा अन् इतर वरचे काम - बघा जी माझं काम साफ हे कट कट आवडत नाही मले आणी आठ दिवसाने दोन सुट्या करतो म्यॉ.
अपर्णा - अग मला 12 नंतर बालक मंदिराला जयाचं असत. तुझी यायची वेळ कशी जमणार! शिवाय रेट सुद्धा खूप सांगतेस बघ भांडी धुण अन् पुसणं सहाशे देईन.
सखूबाई - केलं बी असतं बाई पर वेळ जमणार नाही बघा त्या पांढरीपांडेच्या आधी जातो त्यांच्या शेजारी तवा एक वाजतोन मग म्यॉ पांदरीन बाई कड जातो गेल्या बरबर आधी टी. व्ही बघतो कारण त्याबी बघत असतात ना! कामगार विश्व. मग आम्ही दोघी त्या वर डस्कसन करतो. त्या बाई लई छान समजवतेत. समस्यांवर उपाय काय? त्या सोसल वर्कच काम करतेत ना! आली असती पर वेळ जमनार नाय -बर बाई येतो म्यॉ!
तिसरी - अर्चना - बाई पाहिजल नां तुम्हाला मला तांबे बाईंनी पाठवलाय.
अपर्णा - हो का -- ये काय नांव तुझं, काय काम करशील, काय घेशील अन् केव्हा येशील.
अर्चना - बाई तुम्ही सांगा कंवा येऊ अन् घ्यायचं म्हणाल तर तुम्ही जे द्याल ते आजकालच्या रेट प्रमाणे.
अपर्णा - ठीक आहे झाडू पोचा, धुणं भांडी अन् पुसपास करायची. पाचशे देईन.
अर्चना - कितीक जन हायती.
अपर्णा - आम्ही तीघ जण आहोत.
अर्चना - बरय येईन जी लवकरच आठ-साडेआठ ला येऊन मग सर्व करून नंतर जाईन दुसर्या कामांवर.
अपर्णा - ठीक आहे ये मग उद्या पासून.
तेवढ्यात दारात तिला कुणी तरी भेटते
अपर्णा - झालं आता ही तिला भेटून शिकवणार नक्कीच तेवढ्यात ती आत येते - पण येताना अस काही तिच्या कडे बघते की जणू हिच काम तिनं हिसकावून घेतलंय.
आत येऊन सोफ्यावर सरळ बसली.
अपर्णा - काय बाई कोण तू.
मी शालू जी मला आता वाटत दोघी बाया भेटल्या त्यांनी सांगितला तुम्हाला काम वाली हवी हाय तर काय काय काम हाय?
बाई जरा तमाखू देता का? अन् पाणी बी द्या.
अपर्णा बरं देते पाणी, तंबाखू आमच्या कडे खात नाहीत. आत जाता जाता लक्षात येत की कामापेक्षा ठसकाच जास्त दिसतोय. गाणं म्हणणं काय आरशा बघणं काय अन् पूर्ण पदर पाडून नीट करणं काय? बरं तर घरात कुणी नाहीये म्हणून बरं.
शालू - बोला जी तुमी- मला तुम्ही काय देणार केव्हा यायाचं. पण एक सांगू का थोडं वाढवा जी. महागाई किती झाली हाय अन् तुम्ही अर्चनाला ठरवली असत ना. तर तिच्या भरूशावर राहू नका जी ती तुम्हाला दोन दिवस वाट पाहायला लावेल अन तिसरे दिवस येईल पाहायला ठेवली का कुनी बाई. महा काम टाळू हाय ती, रस्तेवर बोलत बसल नाही तर कुना बाई कडे गप्पा करत बसन माझं तस न्या झटपट काम करून गेलं. हा मग बोला काय देणार.
अपर्णा - सहाशे देणार.
शालू- बाई - सहाशे तर सहाशे पर रोज सकाळी नाश्ता द्याल बाई. म्यॉ खूप लांबून येतू बस पकडून
अपर्णा - मग नाही गं जमणार सकाळीच आठ ते साडे आठ ला मला दोन डबे करावे लागतात. रोजच नाश्त्याच नाही जमणार कारण मला एका बाईचा अनुभव होता ती यायची ती आधी खायला बसायची आर्धा पाऊण तास मग हळू हळू काम. तीन तास लागायचे. त्यात आणखी काहींची हात चलाखी काम चुकार पणा वगैरे वगैरे मी दुसरी बघते अस सांगितलं. तणतण गेली.
खरं तर मी इतकी थकून गेले होते, काम झाली आणि आता या बाया ठरवणं शाळेला तर सुट्टीच द्यावी लागली.
दुसरे दिवशी कुठून कुठून दोघी तिघे आल्या एकीने तर सुचविलं पण बाई मी येईन आठ वाजता तुम्ही मला चाबी देऊन जात जा. मी मनात म्हटलं म्हणजे ही घर भर मनसोक्त वावरणार आणि बाहेर अश्या घर संभाळणार्या बायकांना बद्दल बरंच काही ऐकलं होत.
तर 7-8 जीणींचे इंटरव्ह्यू झाले आणि शेवटी मुलगा व यजमान यांच्या पुढे दोन प्रस्ताव मांडण्याचे ठरवले. 1. नोकरी सोडणार 2. रोजी ने बाई ठेवायची. आली नसेल त्या दिवशी हॉटेलचा डबा किंवा बाहेर जेवायचं. नाहीतर थोडक्या कामासाठी ठेवायची बाई अन सर्व काम तिघांनी मिळून करायची. हे ठरवल्या नंतर जरा मनाला शांती मिळाली. अन् जरा विश्रांती घ्यावी म्हणून वळले तोच बेल वाजली.
परत नवी मोलकरीण का? नको ग बाई ते ठरवण अन् आशा लावून घणे.
