1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन

समाजाचाच विचार करणारा नेता

- नितिन फलटणकर

राज यांचा वाढदिवस मुंबईत १४ तारखेला साजरा केल्यानंतर 'वेबदुनिया'शी संवाद साधतना त्यांनी राज यांचे अनेक पैलू उलगडले.       
''राज यांच्यात एक करिश्मा करण्याची ताकद आहे. ती तुम्हाला त्यांच्याकडे खेचते. मी जेव्हा त्यांच्यासोबत एक कार्यकर्ता म्हणून वावरत असतो, त्यावेळी मला त्यांचे फार वेगळे पैलू दिसतात. त्यावेळी राज 24 तास फक्त राजकारणाचाच विचार करतात, असे नाही, तर समाजात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्याचे वेड त्यांना आहे. तरीही त्यांच्यात आकर्षुन घेणारे नेमके काय आहे हे सांगणे फार कठीण आहे. पण त्यांच्यात करिश्मा घडविण्याची ताकद आहे, हे नक्की.'' राज यांचे निकटवर्तीय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितिन सरदेसाई राज यांच्याविषयी बोलताना भरभरून बोलत होते. राज यांचा वाढदिवस मुंबईत १४ तारखेला साजरा केल्यानंतर 'वेबदुनिया'शी संवाद साधतना त्यांनी राज यांचे अनेक पैलू उलगडले.

'राज केवळ राजकारणी नाहीत. ते संगीत, इतिहास, समाजकारण, कला आणि क्रीडा क्षेत्रातले उत्तम जाणकार आहेत. संगीताचे त्यांना प्रचंड वेड आहे. म्हणूनच त्यांचे नाव कदाचित 'स्वरराज' असावे. या सर्व क्षेत्रात रस असलेला तरुण राजकारणी म्हणून कदाचित आजची तरुण पिढी त्यांच्याकडे आकर्षित होत असावी, सरदेसाई राज यांच्या 'करिष्म्याटीक पर्सनॅलिटीचे' विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात.

  महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईने कित्येक जणांना आधार दिला आहे. कित्येक जणांचे पोट मुंबईवर चालते. असे असताना तुम्ही घराचेच नुकसान करत असाल तर आम्ही गप्प का बसायचे? हे मत राज साहेबांनी व्यक्त केले होते.      
पण राज यांच्या प्रभावाचे कारण तेवढेच नाही. ते पुढे म्हणतात, ''तरुण पिढीला तेच तेच राजकारणी पाहून कंटाळा आला आहे. राज यांनी मांडलेल्या भूमिकेत आत्मीयता आहे. त्यामुळे केवळ तरुणच नाही तर मध्यमवयीन मध्यमवर्गीयांनाही राज यांनी मांडलेली भूमिका आपली वाटते. राज यांच्यावर मराठीच्या मुद्द्यांवरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले, अजूनही होत आहेत, परंतु त्यांनी मांडलेल्या विचारांना मराठी जनतेने पाठिंबा दिला नसता, तर मराठीचे हे आंदोलन इतके यशस्वी ठरलेच नसते.''

हिंदी प्रसारमाध्यमांनी राज यांची भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडली. मुळात राज यांनी काय म्हटले आहे, त्या मुद्यांचे पृथक्करण करण्यापूर्वीच त्यांनी बातम्या देण्यास सुरुवात केली, अशी टीका करून सरदेसाई म्हणाले, की महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईने कित्येक जणांना आधार दिला आहे. कित्येक जणांचे पोट मुंबईवर चालते. असे असताना तुम्ही घराचेच नुकसान करत असाल तर आम्ही गप्प का बसायचे? हे मत राज साहेबांनी व्यक्त केले होते. मराठी आणि महाराष्ट्राचा विकास हेच आमचे धोरण आहे, आमच्या पक्षाचे नावच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. महाराष्ट्राचे नवनिर्माण करताना सर्वच जणांना सोबत घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मुंबईत येणार्‍या प्रत्येकालाच आमचा विरोध आहे, असे नाही. हे स्पष्ट करताना ते म्हणतात, 'गेल्या कित्येक वर्षांपासून बंगाली, गुजराती, इतकेच काय तर परदेशातूनही येऊन लोक मुंबईत राहतात. परंतु, त्याला आम्ही कधीच विरोध केलेला नाही. कारण त्यांनी मराठी संस्कृती स्वीकारली आहे. त्यांना महाराष्ट्राचे सणवार आपलेसे वाटतात. मुंबईसाठी योगदान करण्यास ते कायम तयार असतात.' पण जे मुंबईत येऊन तिला गलिच्छ करणार असतील तर आम्ही त्यांना विरोध का नाही करायचा? असा प्रश्न उपस्थित करत सरदेसाई म्हणाले, राज यांनी हाच मुद्दा मांडला आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासाची भाषा बोलतो. यात आमची चुक काय? उत्तर भारतीयांना आमचा विरोध नाही. परंतु, मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाआड कोणी येण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही त्याला विरोध करू. आगामी काळातही मराठीचे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत सरदेसाई यांनी दिले.

'मनसे'चा मूळ मुद्दाच महाराष्ट्र आणि मराठी विकासाचा आहे. मध्यंतरीच्या आंदोलनानंतर मनसेने सुरू केलेल्या बेरोजगार नोंदणी अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मार्गातून अनेकांना मनसेने नोकर्‍याही मिळवून दिल्या आहेत आणि आगामी काळात मनसे हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

राज यांच्या भूमिकेला काही राजकारण्यांनी जाणून-बुजून लवचिक करत आपल्या स्वार्थासाठी वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु, मराठी जनतेने राज यांचीच साथ दिली. या प्रकरणी राज यांच्यावर जमशेदपूर न्यायालयाने अटक वॉरंट बजावले असले तरी आमचा न्यायपालिकेवर संपूर्ण विश्वास असून, आम्ही या विरोधात न्यायालयीन लढा देण्यास तयार असल्याचे सरदेसाईंनी स्पष्ट केले.

  ''मुळात हा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचे राजकारण होता कामा नये. आज अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात. असेच महाराजांचे स्मारक मुंबईत उभे राहिले तर तो महाराष्ट्राचा गौरवच ठरेल,''      
शिवपुतळ्यावर सावध भूमिका
अरबी समुद्रात उभारल्या जाणार्‍या शिवपुतळ्यावर सध्या वादविवाद सुरू आहे. याच प्रकरणावरून लोकसत्ताचे संपादक ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्याव घरार शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यासंदर्भात बोलताना सरदेसाई यांनी या हल्ल्याचा निषेध केला. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे, असे मत व्यक्त केले. पण त्याचवेळी पुतळा उभारणीला 'मनसे'चा विरोध नाही, असेही दाखविण्याचा प्रयत्न केला. ''मुळात हा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचे राजकारण होता कामा नये. आज अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात. असेच महाराजांचे स्मारक मुंबईत उभे राहिले तर तो महाराष्ट्राचा गौरवच ठरेल,'' हे सांगितल्यानंतर ''परंतु यातून मिळणार्‍या पैशांचा उपयोग विकास कामातही करता येऊ शकतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे, असेही सरदेसाई म्हणाले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा